Photo – नांदेड जिल्ह्याला पावसाने झोडपले; नदी-नाले तुडुंब

नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, जिल्हा प्रशासन याबद्दल सतर्क आहे.

नागरिकांनी पुराच्या पाण्यात किंवा नाल्यामध्ये जाऊ नये, तसेच पूर आलेल्या भागात सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच नदी,नाल्यांना पूर आले असून, आपत्ती व्यवस्थापन व अन्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

सोमवारी दुपारी चार वाजता पासदगाव पुलावरुन पाणी जात होते. मात्र प्रशासनातील कर्मचार्‍यांनी वारंवार सांगून सुध्दा एक व्यक्ती प्रशासनाचे काहीच न ऐकता सदरच्या पुलावरुन पुढे गेला तो वाहून गेला असून, त्याचा शोध सुरु आहे.

गोदावरी नदीकाठावर वसरणी पंचवटीनगर साईबाबा कमान जवळ असलेल्या इमारतीत दुसर्‍या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने तेथील इमारतीत अडकलेल्या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

सिरजखोड येथील गोदावरी नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने बामणी, येळेगाव थडी, मनूर, संगम या गावचा धर्माबादकडे येणारा रस्ता बंद झाला असून, पर्यायी व्यवस्था म्हणुन हुंनगुंदा ते कुंडलवाडी मार्ग सुरु आहे.

राहेगाव ते किक्की या दोन गावामधील पुलावरुन पाणी जात असल्याने लोकांना जाता येत नाही. पुलावरुन पाणी कमी होईपर्यंत कुणीही या पाण्यामधून जावू नये अशा सुचना प्रशासनाने दिल्याचे त्यांनी सांगितले.