Plane Crash: बाडमेरमध्ये हवाई दलाचे मिग 29 विमान कोसळले, कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश

राजस्थानमधील बारमेरमध्ये हवाई दलाचे ‘मिग 29’ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हे लढाऊ विमान कोसळले आणि विमानाला मोठा स्फोट होऊन आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

लोकवस्ती नसलेल्या भागात हा अपघात झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. बाडमेरचे जिल्हाधिकारी निशांत जैन, एसपी नरेंद्र सिंह मीणा आणि जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. या दुर्घटनेत वैमानिक सुखरूप बचावल्याचे हवाई दलाने एक निवेदन जारी करून सांगितले आहे.

वायुसेनेने एक्सवर पोस्ट करत सांगितले की, ‘बाडमेर सेक्टरमध्ये नियमित रात्रीच्या प्रशिक्षणादरम्यान, आयएएफ मिग-29 मध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वेळीच प्रसंगावधान राखून पायलट विमानातून बाहेर पडला. पायलट सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, याप्रकरणी आता कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

एसपी नरेंद्र सिंह मीणा यांनी या दुर्घटनेबाबत सांगितले की, बाडमेर उत्रलाई एअरबेसजवळ हा अपघात झाला. मिग-29 ला अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक वेळा मिग-29 अपघात झाला आहे.