नितेशची सुवर्ण किमया, बॅडमिंटनची गोल्ड आणि गोड बातमी

बॅडमिंटनने आज हिंदुस्थानसाठी गोल्ड आणि गोड बातमी दिली. बॅडमिंटनपटू नितेश कुमारने क्षणाक्षणाला रंग बदलणाऱया सामन्यात ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21 आणि 23-21 असा निसटता पराभव करत हिंदुस्थानला पॅरिस पॅरिलिम्पिकमध्ये दुसरे सुवर्ण जिंकून दिले. मात्र थुलीसिमथी मुरुगेसनला महिला एकेरीच्या एसयू 5 श्रेणी तर सुहास यथिराजला पुरुष एकेरीच्या एलएल 4 श्रेणीच्या सुवर्ण लढतीत पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे हिंदुस्थानच्या दोन्ही बॅडमिंटनपटूंना सुवर्णाऐवजी रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. परिणामतः पॅरिस पॅरालिम्पिकच्या पाचव्या दिवशी हिंदुस्थानने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली.

आज हिंदुस्थानने एक सुवर्ण जिंकले असले तरी मुरुगेसन आणि यथिराजला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. तसेच महिला एकेरीच्या एसयू 5 श्रेणीत मनीषा रामदासने स्वित्झर्लंडच्या पॅथरिन रोसेनग्रेनचा 21-12, 21-8 असा सहज पराभव केला.

अॅथलेटिक्स, बॅडमिंटनमध्ये चार-चार पदके

प्रीती पालने 100 आणि 200 मीटर शर्यतीत कांस्य जिंकून पराक्रम केला. तसेच थाळीफेकीत योगेश कथुनियाला सुवर्ण कामगिरी करण्यात अपयश आले. त्याने 42.22 मीटर फेक करत रौप्य जिंकले, तर निशाद कुमारने उंच उडीत 2.04 मीटर झेप घेतली. बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदके पटकावली.