बारा दिवसांनंतरही गिरणी कामगारांचे उपोषण सुरूच; आंदोलनकर्त्याची प्रकृती ढासळली, मिंधे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

गिरणी कामगारांचे मुंबईतच मोफत पुनर्वसन करावे व उर्वरित सर्व गिरणी कामगार व वारसांना घरासाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा एक संधी द्यावी आदी मागण्यांसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी येथे गिरणी कामगार व वारसांचे संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून अखंड धरणे आंदोलन सुरू आहे. संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे समन्वयक समिती सदस्य रमाकांत बने व गिरणी कामगार नेते हेमंत गोसावी हे गेल्या बारा दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. हेमंत गोसावी यांची प्रकृती ढासळत असतानाही सरकारला त्याचे गांभीर्य नाही. त्यामुळे गिरणी कामगार व वारसांनी सरकारच्या असंवेदनशीलतेचा जाहीर निषेध केला.

शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी सोमवारी या आंदोलनास भेट दिली. यावेळी गिरणी कामगारांसोबत संवाद साधताना खासदार अरविंद सावंत म्हणाले, मराठी माणूस उद्ध्वस्त होताना अन्य कोणीही अस्वस्थ होत नाही. अस्वस्थ होते फक्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना! या मुंबईला महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी जे आंदोलन झाले, 106 हुतात्मे झाले त्या आंदोलनात सगळय़ात मोठा सहभाग गिरणी कामगारांचा होता. याची जाणीव ठेवून शिवसेनाप्रमुखांनी गिरणी कामगारांना घरे मिळायला हवीत अशी भूमिका घेतली. तीच भूमिका घेऊन गिरणी कामगारांच्या पाठीशी शिवसेना आजही तशीच ठाम उभी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

आता सरकारचे तेरावे घालावे लागेल

z गिरणी कामगारांना मुंबईबाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणजे सरकार किती नीचपणे वागतेय त्याचे हे उदाहरण… आज आंदोलनाचा बारावा दिवस आहे. आता सरकारचे बारावे, तेरावे तुम्हाला घालावे लागेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना तुमच्यासोबत उभी असून तुम्हाला न्याय मिळवून देणारच, असा ठाम विश्वास अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.