शिवडी येथे आज सकाळी पाचव्या मजल्यावरील गच्चीवरून झोपलेल्या अवस्थेत एक तरुणी खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कशिश कसबे उर्फ कशिश शेख (19) असे तिचे नाव होते. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी गुह्यांची नोंद करून 16 वर्षाच्या मुलाची डोंगरी बालगृहात रवानगी केली आहे.
शिवडी येथील टाटा मैदानाजवळ एका बंद कंपनीची पडकी इमारत आहे. त्या इमारतीमध्ये कोणीही वास्तव्यास नाही. परंतू कशिश एका 16 वर्षांच्या मुलासोबत तेथे राहत होती. रविवारी रात्री दोघेही नेहमीप्रमाणे इमारतीच्या गच्चीवर झोपले होते. मात्र आज सकाळी कशिश इमारतीच्या खाली पडलेली आणि तिच्यासोबतचा मुलगा गायब असल्याचे आढळून आले. हा प्रकार कळताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी कशिशला केईएम इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पाचव्या मजल्यावरून पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, कशिशच्या आईने या प्रकरणात संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिच्यासोबत राहणाऱ्या मुलाला शोधून काढले व त्याची रवानगी डोंगरी बालगृहात केली. रात्री जाग आली तेव्हा कशिश जागेवर नव्हती. म्हणून तिचा शोध घेतला असता ती इमारतीच्या खाली पडलेली आढळली. नेमके काय झाले ते समजेनासे झाले. त्यामुळे घाबरून तेथून पळून गेलो असे मुलाचे म्हणणे असल्याचे सूत्रांकडून समजते.