कशेडी दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर, गणेशभक्तांचा होणार हिरमोड

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा घाटातील दुसरा बोगदा 3 सप्टेंबरपूर्वी वाहतुकीस खुला करून चाकरमानी दोन्ही बोगद्यांतून मार्गस्थ होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेडी बोगद्याच्या पाहणीदरम्यान जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात दुसऱया बोगद्याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवात दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर बनली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे फाट्य़ापासून कशेडी घाटापर्यंतच्या रखडलेल्या कामांसह खड्डय़ांत गेलेल्या मार्गामुळे गणेशभक्तांना यंदाही जीवघेणाच प्रवास करावा लागणार होता.

महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत सोडून पळ काढणाऱ्या ठेकाधारक कंपनीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले, तर 3 सप्टेंबरपूर्वी महामार्ग सुस्थितीत आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार माणगाव पोलीस स्थानकात ठेकाधारक पंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग खात्याने गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवत गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी पंबर कसली आहे. खड्डे बुजवण्यासाठी चार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. त्यानुसार युद्धपातळीवर खड्डे बुजवून मार्ग सुस्थितीत आणण्याचे काम सुरू आहे. चाकरमान्यांसाठी ही समाधानकारक बाब असली तरी बुजवलेले खड्डे कितपत तग धरतील, हादेखील प्रश्नच आहे.

दुसऱ्या बोगद्याचे काम संथ गतीनेच…
पाहणीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांना 3 सप्टेंबरपर्यंत दुसऱया बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱयासह ठेकेदारांनी दिले होते. त्यानुसार युद्धपातळीवर काम सुरू असल्याचा दावा केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनीही 3 सप्टेंबरपूर्वी दुसऱया बोगद्याचे काम पूर्ण होईल अन् कोकणात जाणारे चाकरमानी दोन्ही बोगद्यांतून मार्गस्थ होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. प्रत्यक्षात दुसऱया बोगद्याचे काम संथ गतीने सुरू आहे. दुसऱया बोगद्याच्या भोगावकडील बाजूला अजून भराव करण्याचे काम सुरू आहे. बाजूपट्टय़ा असलेल्या पुलाजवळील रस्ताही अद्याप जोडण्यात आलेला नाही. दुसऱया बोगद्याच्या कामादरम्यानची गटारेदेखील अपूर्णावस्थेत आहेत. दोन्ही बोगद्यांना जोडणारे रस्तेदेखील अर्धवट स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.