शेअर बाजार नियामक संस्था (सेबी)च्या प्रमुखपदी असतानाही माधवी बुच यांनी तीन ठिकाणांहून वेतन व अन्य स्वरूपात लाभ घेतल्याचे आरोप आज काँग्रेसने केले. सेबी बोर्डावर असताना बुच यांनी आयसीआयसीआय बँकेकडून 16.80 कोटी रुपये पगार घेतला होता, असा दावा काँग्रेसने केला असून बुच यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या माधवी बुच यांच्यावर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. माधवी यांनी सेबीशी संबंधित असताना आयसीआयसीआय बँकेसह तीन ठिकाणांहून पगार घेतल्याचा आरोप खेडा यांनी केला.
बँकेने केला इन्कार
बुच यांनी या आरोपांचे खंडन केले नसले तरी, आयसीआयसीआय बँकेने 31 ऑक्टोबर 2013 रोजी त्या निवृत्त झाल्या होत्या त्यानंतर त्यांना कोणतेही वेतन दिले नाही किंवा लाभ दिलेले नाहीत असे सांगितले.
राजीनाम्याची मागणी
सेबीचे पूर्णवेळ सदस्य असूनही तुम्ही आयसीआयसीआयकडून पगार का घेत होता? हे SEBI च्या कलम 54 चे थेट उल्लंघन आहे. माधवी यांना थोडीही लाज वाटत असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी खेडा यांनी केली. त्यांनी 2017-2024 दरम्यान आयसीआयसीआय प्रुडेन्शियलकडून 22,41,000 रुपये का घेतले, असे सवाल त्यांनी केले.
काँग्रेसचे थेट पंतप्रधान मोदींना प्रश्न
बुच यांना संरक्षण दिल्याबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. मौन बाळगून ‘सेबी’च्या अध्यक्षांना वाचवणाऱया ‘नॉन बायोलॉजिकल’ पंतप्रधानांनी उघडपणे समोर येऊन प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. सेबीच्या अध्यक्ष लाभाचे पद भूषवत होत्या व सेबीमध्ये असताना आयसीआयसीआयकडून वेतन/उत्पन्न घेत होत्या, याची पंतप्रधानांना कल्पना होती का, अशी पृच्छा त्यांनी केली आहे.
काय आहेत आरोप…
माधवी पुरी बुच या 5 एप्रिल 2017 ते 4 ऑक्टोबर 2021 या कालावधीत सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य होत्या. त्यानंतर 2 मार्च 2022 रोजी त्या सेबीच्या अध्यक्षा झाल्या. सेबीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणाऱया समितीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा समावेश आहे, असे खेडा यांनी म्हटले आहे. सेबीचे पूर्णवेळ सदस्य असूनही त्या आयसीआयसीआय बँकेकडून नियमित उत्पन्न घेत होत्या, जे 16.80 कोटी रुपये होते. त्या बँकेकडून आयसीआयसीआय प्रुडेंशियल, ईएसओपीचा टीडीएस लाभही घेत होत्या, असा दावा खेडा यांनी केला आहे. हे आयकर चुकवण्याचे प्रकरण आहे… ही कर चुकवेगिरी 50 लाखांच्या घरात आहे, असा आरोप त्यांनी केला. झी समूहाचे प्रमुख सुभाष चंद्र यांनीही सोमवारी सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला.