
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात आज प्रथमच हिंदुस्थानच्या राष्ट्रपती देवीच्या दर्शनासाठी दाखल झाल्या. त्यामुळे तब्बल चार तास इतर भाविकांसाठी देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्री अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करून विधिवत पूजा केली. तसेच एकारती, पंचारती करून देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जि.प.चे सीईओ एस. कार्तिकेयन, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.
राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा भाग म्हणून सकाळी नऊपासून मंदिर परिसर पूर्ण रिकामा करण्यात आला. इतर भाविकांसाठीही देवीचे दर्शन बंद करण्यात आले. दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी राष्ट्रपती मंदिरात दाखल झाल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे स्वागत केले. दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी श्रीअंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली. मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली. देवीच्या किरणोत्सवाची माहिती अमोल येडगे यांनी त्यांना दिली.
रस्त्यावरील शुकशुकाटामुळे कोरोनाकाळाची आठवण
राष्ट्रपतींच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राष्ट्रपती येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावर तासभर अगोदर पोलिसांकडून रस्ता सर्व वाहतुकीसाठी रिकामा करण्यात येत होता. पोलिसांच्या कडक पहाऱ्यामुळे निर्मनुष्य बनलेल्या या रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. यावेळी कोरोनाकाळाची आठवण झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत होते. दरम्यान, ठिकठिकाणी वाहतूक रोखण्यात आल्याने वाहनधारकांची मोठी कुचंबना झाली. लहान-मोठी हजारो वाहने रस्त्यावर थांबून राहिल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडकला वाहतूककोंडीत
राष्ट्रपतींच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यामुळे जिल्ह्यात आज वाहतूककोंडी पाहायला मिळाली. या कोंडीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही ताफा काही काळ अडकून पडला. आजपासून तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर शरद पवार आले आहेत. शहरात ज्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे, तेथे पोहोचण्यापूर्वीच अलीकडे त्यांचा ताफा वाहतूककोंडीत अडकला. काही वेळ वाट पाहून त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी वाटेतील वाहने बाजूला करत त्यांचा ताफा हॉटेलमध्ये आणला.