अरेरे… हिंदुस्थानी नागरिकांचे अमेरिकेत पायी चालत स्थलांतर

कॅनडातून मोठय़ा संख्येने हिंदुस्थानी अमेरिकेत स्थलांतर करत आहेत. या वर्षी जूनमध्ये विक्रमी संख्येने हिंदुस्थानी अमेरिकेत दाखल झाले असून यूकेमध्येही स्थलांतराचे प्रमाण मोठे आहे. अमेरिकेत हिंदुस्थानींचे अवैधरित्या प्रवेश वाढले आहेत. जून 2024 मध्ये 5152 हिंदुस्थानी नागरिकांनी कॅनडातून पायी सीमा पार करून अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश घेतलाय. या संख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम पार केलेत. एकीकडे अमेरिकेत कायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱया हिंदुस्थानींचे प्रस्थ वाढत असताना दुसरीकडे बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱयांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आत्तापर्यंत अमेरिकेत प्रवेश केलेल्या हिंदुस्थानींचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. अमेरिकी प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, कॅनडातून अमेरिकेत प्रवेश करणाऱया हिंदुस्थानींचे प्रमाण या वर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तब्बल 47 टक्क्यांनी वाढलंय. जानेवारी महिन्यात हे प्रमाण 2548 होते. जूनपर्यंत ते महिन्याला 3733 नागरिक इतके वाढले. तर फक्त जूनमध्ये 5152 हिंदुस्थानींनी अमेरिकेत अवैधरीत्या पायी प्रवेश केला.

– अमेरिका व कॅनडा यांच्यात जवळपास 9 हजार किलोमीटरची खुली सीमारेषा आहे. ही जगातली सर्वात लांब अशी खुली सीमा मानली जाते. मेक्सिको व अमेरिकेच्या सीमेपेक्षा ही सीमा दुप्पट तर हिंदुस्थान व चीनच्या 3400 किलोमीटरच्या सीमेपेक्षा जवळपास तिप्पट लांबीची ही खुली सीमा आहे.

– अवैधरीत्या प्रवेश करणाऱयांना ताब्यात घेणे, त्यांची पुन्हा कॅनडात पाठवणी करणे किंवा सीमेवरच लक्षात आल्यास त्यांना प्रवेशच नाकारणे, अशा उपायांचा अवलंब अमेरिकी प्रशासनाकडून केला जात आहे.

– ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील कायदेशीर वास्तव्य करणाऱया हिंदुस्थानींचे प्रमाण एपूण लोकसंख्येच्या 1.5 टक्के इतके आहे.

– अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर इतर देशातील नागरिकांकडून कॅनडाच्या भूमीचा वापर केला जात असल्याचे दिसून येतंय. या पार्श्वभूमीवर कॅनडातील व्हिसा प्रक्रिया अधिक कठोर केली जावी, अशी मागणी अमेरिकेकडून केली जात आहे.