सोयाबीनले भाव नाही, भाजपाले मत नाही! पोळ्यात शेतकऱ्यांचा संताप

>> प्रसाद नायगावकर

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. दोन दिवसांत तब्बल 22 हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, तूर आदी खरीप पिके खरडून गेली. त्यातच आज सोमवारी सर्वत्र शेतकऱ्यांचा पोळा हा सण पावसाच्या सावटात पार पडला. यावेळी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या शेतकरी धोरणांवर टीका करून संताप व्यक्त केला.

काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी बैलाच्या पाठीवर सरकारविरोधी घोषणा लिहिल्या. तर कुठे सोयाबीनचे दर घसरल्याचा संताप व्यक्त झाला. ‘सोयाबीनले भाव नाही, भाजपाले मत नाही’, असा संताप व्यक्त करून भाजपसह सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सरकारविरोधी, उपहासात्मक झडत्यांनी अनेक ठिकाणी पोळ्यात रंगत आणली.

पोळा रे पोळा, बैलपौळा; सारे झाले पोळ्यामंदी गोळा, शेतकऱ्यांच्या मदतीचा भुलला हो वादा, एक नमन गौरा, पार्वती, हरबोला हरहर महादेव अशा झडत्या रंगल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरही झडत्यांमधून टीका झाली. सलाईन रे सलाईन… सरकारचं सलाईन, मुख्यमंत्र्यांची आता लाडकी झाली हो बहीण! बहिणीच्या लाडात लंबा झाला हो दाजी, कापूस, सोयाबीनले नाई भाव बहिणीचीच हाये हाजी हाजी! अनेक गावांमध्ये आज पावसामुळे पोळा सणावर विरजन पडले. गावांमधील बैलजोडींची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने त्यावर पोळ्यात अनेकांनी चिंतन केले. ग्रामीण भागात पावसाने सर्वत्र कहर केल्याने शेतकऱ्यांनी घरीच बैलजोडीचे पूजन करून पोळा साजरा केला.