महाराष्ट्राचा बिहार झालाय सरकारने जाहीर करून टाकावं, जितेंद्र आव्हाड यांची टीका

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा पुण्यातील नाना पेठेत गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मिंधे भाजप सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्राचा बिहार झालाय असं आता एक फूल, दोन हाफ सरकारने जाहीर करून टाकावं, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

पुण्यात रविवारी पाच सहा जणांच्या टोळक्याने ऐन गर्दीत वनराज आंदेकर यांची हत्या केली. या घटनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट (X) करत सरकारचे कान उपटले आहेत. ते म्हणाले की, पुण्यात पुन्हा एकदा भर रस्त्यात एका नगरसेवकावर बंदुकीच्या गोळ्या आणि कोयत्याने वार करून त्यांचा जीव घेण्यात आला. पण पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या गुलाबी गाडीतून महाराष्ट्राचा दौरा करत, राख्या बांधत फिरतायंत. सामान्य अल्पसंख्याकांवर द्वेषपूर्ण हल्ले, माताभगिनींवर अतिप्रसंग, महात्म्यांचे सततचे अवमान, बदनामी आणि आता हा गुंडाराज, महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच एवढी हिंसा, एवढी गुन्हेगारी फोफावली नव्हती. महाराष्ट्राचा बिहार झालाय असं आता एक फूल, दोन हाफ सरकारने जाहीर करून टाकावं, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी मिंधे सरकारला लगावला आहे.