Nanded Rain – नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान

नांदेड जिल्ह्यात रविवारी सायंकाळी तसेच रात्री व सोमवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र अनेक शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 45 मंडळात रविवारी अतिवृष्टी झाल्याची नोंद असून, विष्णूपुरी प्रकल्पाचे 14 दरवाजे आज दुपारी उघडण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. तसेच कंधार तालुक्यातील लिंबोटी धरणाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याचा आणखी येवा वाढल्यास नदीकाठच्या लोकांना व सखल भागातील मंडळींना निवारा केंद्रात हलविण्याची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील हदगाव, अर्धापूर, किनवट,माहूर, लोहा, देगलूर या तालुक्यात रविवारी रात्री व आज सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्याचा विदर्भाशी संपर्क तुटला असून, किनवट ते यवतमाळ तसेच हिमायतनगर ते किनवट या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सितानदी ओसंडून वाहत असल्याने मुदखेड ते उमरी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नांदेड शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले आहे. अनेक भागात गुडघाभर पाणी साचले असून, श्रावस्तीनगर, विष्णूनगर, गोकुळनगर, हमालपूरा आदी भागातील घरात पाणी शिरले आहे. हिंगोली गेट अंडरब्रिज पूर्णतः पाण्याखाली असून, तेथून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

विष्णूपुरी प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले असून, हा प्रकल्प 94.23 टक्के एवढा भरला आहे. उघडलेल्या दरवाजातून 223471 क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला असून, जुन्या भागातील नावघाटच्या संत दासगणू पुलावरुन पाणी जात असल्याने सिडकोला जाणारी वाहतूक यामुळे बंद झाली आहे. याठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह असाच वाढत गेल्यास शहरातील सखल भागातील लोकांना हलविण्याची प्रक्रिया सुरु करावी लागेल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने मनपाला दिला आहे. मनपाने 14 ठिकाणी निवार्‍याची व्यवस्था सुरु केली असून, रात्रीतून पाणी वाढल्यास आपत्ती व्यवस्थापन व पोलीस दलाची मदत घेवून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येईल. नांदेड जिल्ह्यातील 45 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यात नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, तुप्पा, वसरणी, विष्णूपुरी, लिंबगाव, तरोडा, वाजेगाव, नाळेश्वर, बिलोली, आदमपूर, लोहगाव, जांब, बार्‍हाळी, मुक्रमाबाद, अंबुलगा, दिग्रस, कुरुळा, लोहा, माळाकोळी, कापशी, सोनखेड, शेवडी, कलंबर, हदगाव, तळणी, मनाठा, तामसा, पिंपरखेड, आष्टी, भोकर, मरखेल, मालेगाव, हाणेगाव, नरंगल, मुदखेड, बारड, जवळगाव, अर्धापूर, दाभड, कुटुंर, नरसी, मांजरम या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. हदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उंचाडा व तालंग येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकरी व काही महिलांना एनडीआरएफच्या टिमच्या मदतीने हदगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी सुरक्षितस्थळी हलविले.

या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची शक्यता आहे. कापूस, सोयाबीन, ज्वारी व मक्याचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतात जवळपास दोन ते तीन फुट पाणी असून, पिके पाण्याखाली आहेत.