Pune News – आंबेगाव तालुक्यात बिबट्या जेरबंद, तरिही नागरिकांमध्ये भीती कायम

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात मंचर वनपरिक्षेत्र हद्दीत बिबट्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असतानाच पोंदेवाडी येथे वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये अंदाजे सहा वर्षाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनरक्षक साईमाला गीत्ते यांनी दिली.

आंबेगाव तालुक्याील पोंदेवाडी या परिसरात मागील पंधरा-वीस दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. दोन आठवड्यापूर्वी तीन शेळ्या बिबट्याने ठार मारल्या होत्या. त्याचबरोबर आत्तापर्यंत अनेक वेळा बिबट्याने हल्ले करून शेतकऱ्यांची पाळीव जनावरे ठार मारली आहेत. दोन दिवसांपूर्वी रोडेमळा परिसरातील कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याचा उसाच्या शेतात नेऊन फाडसा पाडला होता. काल या परिसरात असणाऱ्या मेंढपाळाच्या घोडीवर बिबट्याने हल्ला करून त्या घोडीला जखमी केले होते. त्यामुळे सरपंच नीलम अनिल वाळुंज यांच्या मागणीनुसार वनविभागाच्या वनरक्षक साई मला गीते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व वरिष्ठांशी चर्चा करून त्या ठिकाणी काल सायंकाळच्या सुमारास या परिसरात पिंजरा लावला होता. मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास नर जातीचा अंदाजे सहा वर्षाचा बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान मानले असले तरी अजूनही या परिसरात अनेक बिबटे असण्याची शक्यता सरपंच नीलम वाळुंज यांनी व्यक्त केली आहे.