
>> प्रसाद नायगावकर
गुन्हेगारीच्या बाबतीत डंक्यावर असलेल्या यवतमाळमध्ये भर रस्त्यावर अंडा राईसच्या दुकानावर दारू रिचविल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी उघडकीस आणला आहे. आणि हे दुकान बंद पाडले आहेत .
यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी अंडा राईस दुकाने आहेत . यातील बहुतांश दुकाने ही अतिक्रमणात असून काहींनी आपली दुकाने मिळेल त्या जागी थाटली आहेत. काही दुकाने तर चक्क मंदिराजवळ तर काही दुकाने फूटपाथ वर उभारली आहेत. तळीराम अगदी बेधडकपणे दुकानातून मद्य आणून या ठिकाणी मद्य रिचवितात. यवतमाळमध्ये असे मिनी बार जागोजागी आढळतात. काही दुकाने अगदी कन्या शाळांच्या रस्त्यावर असून तिथून या रस्त्यावरून विद्यार्थिनींना शाळेत जाणे अवघड होते. याकडे पोलीस प्रशासनाचे आणि नगर पालिकेचे साफ दुर्लक्ष आहे .
असेच एक दुकान आर्णी मार्गावरील दुर्गादेवी मंदिरालगत अंडा राईस व चिवडा दुकान थाटले असून तेथेच फुटपाथवर अतिक्रमण करून मद्यपी दारू रिचवीत असल्याचे निदर्शनास आले. हे लक्षात येताच महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे महिला काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन तेथे धडकल्या, यावेळी काही दारुडे महिलांना धक्काबुक्की करून पळाले, यावेळी दारू भरलेले ग्लास व शिश्या त्याठिकाणी आढळल्या. महिलांच्या आक्रमक पवित्र्यामुळे तळीरामांमध्ये अफरातफर पसरली .
यवतमाळ मध्ये दरदिवसाआड खून होत आहेत, तरुणाईमध्ये गुन्हेगारी फोफावली आहे, महिला मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहे. खुलेआम दारूविक्री आणि अंमली पदार्थ मिळत असताना पोलीस काय झोपा काढत आहे का? असा संतप्त सवाल संध्या सव्वालाखे यांनी उपस्थित केला.