सुरत लूट शिवरायांच्या शौर्याची निशाणी; गुजरातप्रेम ओसंडून वाहणारे चुकीचा इतिहास सांगताहेत! – जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजब पद्धतीने मांडला असून शिवरायांची सुरत लुटलीच नव्हती असा दावा केला. यामुळे मोठे वादंग निर्माण झाले असून विरोधकांनी फडणवीस यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक मोठी पोस्ट शेअर आपली प्रतिक्रिया दिली असून फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

महाराजांबद्दल शंका का निर्माण करता? एवढा राग का व कशासाठी? असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला महाराष्ट्र माफ करणार नाही असेही म्हटले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेवर स्वारी केली अन् सुरत लुटली, हे ऐतिहासिक सत्य आहे. शिवरायांनी सुरत लुटरी, तीही दोन वेळा, 1664 आणि 1670 मध्ये. अनेक तत्कालीन बखरींमध्ये त्याची नोंद आहे. अनेक इतिहासकारांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या स्वारीचे मुख्य कारण हे जंजि-याच्या सिद्धीशी लढाई हेच होते. महाराज सिद्धीशी लढत असताना त्याला प्रचंड शस्त्रसाठा आणि बोटी सुरतेहून पुरविल्या गेल्या होत्या. त्याचा राजकीय राग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात होता आणि सुरत लुटीमागे हे एक प्रमुख कारण होते. तसेच, स्वराज्याची धनसंपदा वाढविणे, हेही मुख्य कारण सुरत लुटीमागे होते. सुरत हे एक प्रमुख व्यापारी केंद्र होते.

या स्वारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना एम्ब्रॉज् नावाच्या एका ख्रिश्चन पाद्रीचे घर दाखवण्यात आले होते. पण, पाद्रीच्या दयाळू वृत्तीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे घर लुटण्यास नकार दिला. तेथेच एक पारेख नावाचे गृहस्थ रहात होते. प्रचंड श्रीमंत असलेल्या पारेख यांची दयाळू, दानशूर अशी ख्याती होती. महाराजांच्या आगमनापूर्वीच पारेख यांचे निधन झाले होते. गरीबांना मदत करणाऱ्या पारेख यांच्या घरालाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पर्श केला नाही. सुरत लुटीचा इतिहास तपासताना हे बघणे अत्यंत महत्वाचे आहे की, या स्वारीत कुठेही रक्तपात, अत्याचार झाला नाही की स्त्रियांशी कोणीही बेअदबी केली नाही. महाराजांनी दोनवेळा सुरत लुटली. पण, दोन्हीवेळा रक्तपात, अत्याचार झाला नाही की स्त्रियांशी कोणीही बेअदबी केली नाही, असेही आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

आता सुरत लुटीचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. ज्यांचे गुजरातप्रेम ओसंडून वाहत आहे ते सुरत लुटीला चुकीचे ठरवत आहेत. पण, सुरत लूट ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची निशाणी आहे. या स्वारीत महाराजांनी कोणालाही त्रास दिला नाही. म्हणूनच तर व्यापाऱ्यांनी समझोता करून आपली संपत्ती महाराजांच्या स्वाधीन केली, त्यांना महाराजांनी मोठ्या मनाने माफ केले. पण जे मग्रुरीने वागले त्यांना धडा शिकवला. त्यामुळे सुरतेवरील स्वारी ही महाराजांच्या शौर्याची आणि शत्रूला क्षमा न करण्याची वृत्ती दाखवून देते. सूरतमध्ये घुसताना इनायत खानला पराभूत केले. सिद्धीला सुरतने मदत केली म्हणून सुरतला धडा शिकवण्यासाठी महाराजांनी हा हल्ला केला होता. जगातल्या सर्वच इतिहासकारांनी याची नोंद घेतली आहे. अगदी लंडन गॅझेटीएरमध्येही याची नोंद करण्यात आली आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ञ बर्नियर यांनीही आपल्या पुस्तकात याची नोंद केलेली आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार यांच्या लेखणात ही नोंद आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले.

फडणवीसांचे गुजरात प्रेम उतू गेले; महाराजांच्या शौर्यावरच आक्षेप घेतला! छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली नाही काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला

अचानक सुरत लुटली नसल्याचा व केवळ छावणी लुटल्याचा इतिहास देवेंद्र फडणवीस साहेबांना कुठून मिळाला, हेच समजत नाही. एकीकडे पुतळा पडल्याने महाराष्ट्रातील वातावरण खराब झालेले असतानाच महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असलेल्या शिवरायांच्या बहादुरी आणि शौर्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे का व कशासाठी? महाराजांनी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, यांच्या वखारीही लूटल्या, मग एकच छावणी लुटली असे कसे म्हणता येईल. सुरत हल्ल्याला चुकीचे ठरविणे हा तद्दन मूर्खपणा आणि महाराजांचा अवमान आहे. त्यांच्या शोर्यावर व युद्ध चातुर्य यावर शंका घेण्यासारखे आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला.

जेम्स लेन याने चुकीच्या माहितीच्या आधारा वर माँ साहेबांची बदनामी केली महाराजांच्या पितृत्वा वर शंका निर्माण केली. आज सूरत लुटी बद्दल चुकीचा इतिहास सांगून त्यांच्या शौर्य आणि कर्तृत्वाबद्दल शंका निर्माण केली. कुठल्या मनुवाद्याने हे खुळ फडणवीस साहेब तुमच्या डोक्यात टाकले? काळानी अनेक वेळा सिद्ध केले की इतिहासाचे विकृतीकरण झिडकारले जाते, असेही ते म्हणाले.