जयदीप आपटे कुठंय? महाराजांचा अपमान करणाऱ्या आरोपीला मिंधे-भाजप सरकार पाठीशी घालतंय! – वडेट्टीवार

बदलापूर अत्याचार घटनेतील आरोपीला अटक करणे सोडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस इतिहासाची तोडमोड करत आहेत.स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आता पंतप्रधान नेहरूंना शिव्या देणार का? असा संतप्त सवाल विचारत महायुती सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांना मानणारे सरकार असूच शकत नाही असा घणाघात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार यांनी सोमवारी सकाळी ट्विट करत सरकारला धारेवर धरले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर शिवप्रेमींकडून मते घेतली, खुर्चीवर बसले. आज त्याच शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या असताना महाराजांचं अपमान करणाऱ्या आरोपीला भाजपचं सरकार पाठीशी घालत आहे. ‘छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ‘ हे फक्त मतांसाठी होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर भाजपने केला हे अखेर आज दहा वर्षानंतर महाराष्ट्राला कळाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून आज सात दिवस झाले, जयदीप आपटे कुठे आहे? त्याला फरार व्हायला कोणी मदत केली? महायुती सरकार छत्रपतींचा अपमान करणाऱ्या जयदीप आपटेला संरक्षण देत आहे का? असा सवाल उपस्थित करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपतींचा अपमान करणाऱ्या जयदीप आपटेला अटक करू शकत नाही मग पंतप्रधान यांच्या माफीला काय अर्थ आहे? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेची माफी का नाही मागितली? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

आरोपीला अटक करणे सोडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस इतिहासाची तोडमोड करत आहेत. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी आता पंतप्रधान नेहरूंना शिव्या देणार? जयदीप आपटेला अटक होत नाही याचा अर्थ महायुती सरकार त्याला वाचवत आहे हे स्पष्ट आहे म्हणत वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.