बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर हिंदूंना निशाणा बनवले जात आहे. आता तर सरकारी शाळांमध्ये शिकवणाऱ्या हिंदू शिक्षकांना बळजबरीने राजीनामा द्यायला भाग पाडले आहे. आतापर्यंत 50 शिक्षकांना राजीनामा द्यायला भाग पाडल्याचे समोर आले आहे.
स्थानिक वृत्तानुसार, 29 ऑगस्ट रोजी विद्यार्थी आणि बाहेरच्या काही लोकांनी बरिशाल येथील बेकरगंज सरकारी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुक्ला राणी हलदर यांच्या कार्यालयात धाव घेऊन त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. बरेच तास धमकावल्यानंतर हलदर यांनी साध्या कागदावर मी राजीनामा देत असल्याचे लिहून नोकरी सोडली. याआधी 18 ऑगस्टला अजीमपूर गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल आणि कॉलेजच्या 50 विद्यार्थिनींनी शाळेच्या मुख्याध्यापिका गितांजली बरुआ यांना घेरले. त्यांच्याकडून सहाय्यक मुख्याध्यापक गौतम चंद्र पॉल आणि शारिरिक शिक्षाच्या शहनाजा अख्तर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गितांजली बरुआ म्हणाल्या त्यांच्या कार्यालयावर हल्ला करत त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. अशाचप्रकारे काजी नजरुल विद्यापीठामध्ये सार्वजनिक प्रशासन आणि शासन अभ्यास विभागामध्ये असोसिएट प्राचार्य संजय कुमार मुखर्जी यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. मुखर्जी यांना सांगण्यात आले की, ते शिक्षण देण्यासाठीची कुवत त्यांच्याकडे नसून त्यांनी राजीनामा द्यावा. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद यूनूस यांनी हिंदूंना सुरक्षेचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन फोल ठरले.
बांगलादेश हिंदू, बौद्ध, ईसाई ओकिया परिषदेचे समन्वयक साजिब सरकारने सांगितले की, देशात अल्पसंख्याक समाजाची परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. विशेष करुन हिंदूंना हल्ले, लुटमार, महिलांची छेडछाड, मंदिरात तोडफोड, घर कार्यालयांची जाळपोळ आणि हत्या याचा सामाना करावा लागत आहे. बांगलादेशच्या निर्वासित लेखिका तसलीमा नसरीन यांनी एक्सवर पोस्टमध्ये लिहिले की, सध्याचे सरकार अल्पसंख्यांकांची रक्षा करण्यास असमर्थ ठरत आहे. सुफी मुस्लिमांचे थडगे आणि दर्गे देखील पाडले जात आहेत.