अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेला गणेशोत्सव शांततेने पार पाडावा, यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पोलिसांनी विविध सूचना केल्या.
मिरवणूक काळात गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांची उधळण करावी तसेच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गणेश मंडळांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी केले.
विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात विजेच्या केबल तसेच व्यापाऱ्यांनी उन्हासाठी बचाव करण्यासाठी लावलेले पाल काढावे, मंडळांसमोर पोलीस किंवा होमगार्ड यांचा बंदोबस्त हवा, मंडळाचे स्वयंसेवकही त्यांच्याबरोबर
राहतील, अशा सूचना त्यांनी केल्या.
गणेशोत्सवकाळात मंडळांनी मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि विसर्जन मिरवणुकीत डीजे न लावता पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले आहे.
गणेशोत्सवाबाबत माहिती देण्यासाठी घोडेगाव पोलीस ठाण्यात बैठक झाली. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर बोलत होते.
गणेशोत्सवामध्ये अनावश्यक खर्च टाळून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करा, गुलालाऐवजी फुलांचा वापर करा, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण हे उपक्रम राबवावेत, अशा विविध सामाजिक उपक्रमांतून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी केले.
■ आक्षेपार्ह देखावे टाळा.
■ महिला सुरक्षेची काळजी घ्या
■ गुलालाचा वापर टाळा.
■ कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे
■ डीजे टाळा.
■ सर्व परवानग्या घ्या