देवेंद्र फडणवीस हे औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ महाविकास आघाडीने आंदोलन केले. हे आंदोलन चिरडून टाकण्याचे पाप फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केले. या महाराष्ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, जय भवानी जय शिवाजी’, घोषणा देण्यापासून रोखले जात आहे, असा आरोप करत याच महाराष्ट्रात आम्ही औरंगजेबाची कबर खोदली. त्यामुळे फडणवीसींना औरंगजेबाच्या गोष्टी गुजरातमध्ये जाऊन कराव्यात असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपतींच्या सुरत लुटीबाबत केलेल्या विधानाचा सडकून समाचार घेतला. ज्या बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठा साम्राज्य लयास नेले आणि पुण्याच्या शनिवारवाड्यावर सगळ्यात आधी ब्रिटिशांचा यूनियन जॅक फडकावला त्या पेशवाईचे देवेंद्र फडणवीस उत्तराधिकारी आहेत. त्याशिवाय त्यांनी अशी भाषा वापरली नसती. फडणवीस नक्की कोणता इतिहास सांगत आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढतोय, संघर्ष करतोय आणि सरकार आमच्यावरच गुन्हे दाखल करत आहे. मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा तोडला हे सरकारचे पाप आहे. हो, पुतळा तुटला नसून सरकारने तोडला आहे. त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणारे आजही मोकाट असून सरकार त्यांना अटक करू शकलेले नाही. कारण ते तुमच्या पेशवाईचे शिलेदार आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मालवणला गेले. जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे लोकही सोबत होते. त्यांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचे काम काम जे भाजपचे गुंड करत होते तुम्ही त्यांचे समर्थक आहात. पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे तुमचे गुंड आम्हाला शिवरायांचा इतिहास शिकवणार का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही ही घोषणा कुणाची होती? जर शिवरायांचे सच्चे भक्त असाल तर बेळगाव-कारवारच्या सिमाप्रश्नाविषयी तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करा, असे आव्हानही राऊत यांनी फडणवीस यांना दिले.
View this post on Instagram
छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे मराठी माणसाचे, मावळ्यांचे राज्य होते. तुम्ही ते खतम करायला निघाला आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही, हा तुमचा एक नवीन चिंतनाचा विषय तुम्ही समोर आणला आहे. तुम्हाला इतिहास काय माहिती? कधी इतिहास शिकलात? किंबहुना शिवरायांच्या इतिहासाचे तुम्ही शत्रू आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत एकदा नाही दोनदा लुटली. राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्यांनी सुरत लुटली, असेही राऊत म्हणाले. सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणात खंडणी देत होते. हा स्वराज्यद्रोह, राष्ट्रद्रोह आहे अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि त्यामुळेच त्यांनी ठरवले की ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल तर सुरत लुटावी लागेल आणि या व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. हा इतिहास फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.
इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू असून भाजपच्या प्रत्येक हरामखोराने शिवरायांचे अपमान केला आहे. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री दिपक केसरकर, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हे महाराजांबाबत बोलले तेव्हा प्रत्येकवेळी फडणवीस यांनी त्यांची बाजू घेतली. हे यांचे शिवरायांबाबतचे बेगमी प्रेम, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत टिप्पणी केली. त्यावेळी पंडित नेहरू तुरुंगात होते, तिथूनच त्यांनी हे पुस्तक लिहिले. शिवरायांबाबत केलेल्या टिप्पणीबाबत त्यांनी महाराष्ट्र आणि शिवरायांची माफी मागितली. तुरुंगात माझ्याकडे संदर्भ कमी असल्याने माझी चूक झाली असे त्यांनी मान्य केले. ही 70-75 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे इतिहासात डोकावण्याऐवजी तुम्ही शिवरायांचा जो अपमान केला त्यावर बोला. शिवपुतळ्याप्रकरणात झालेल्या भ्रष्टाचारावर बोला, असे आव्हान राऊत यांनी दिले.