
टीम इंडियातून बर्याच दिवसांपासून बाहेर असलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेने काऊंटी क्रिकेटमध्ये दणकेबाज शतक ठोकून पुन्हा एकदा संघाचे दार ठोठावले आहे. रहाणेने काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू स्पर्धेत लीसेस्टरसाठी शतक झळकावले. हिंदुस्थान-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी शतक झळकावल्याने त्याच्या टीम इंडियातील पुनरागमनाच्या आशा वाढल्या आहेत.
अजिंक्य रहाणेने टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना जुलै 2023 मध्ये खेळला होता. या सामन्यानंतर तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकला नाही. आता हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेपूर्वी रहाणेने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले तर ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीला टीम इंडियासाठी त्याच्या नावाचा विचार नक्कीच करावा लागेल. काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये कार्डिफमध्ये लिसेस्टरशायर आणि ग्लॅमॉर्गन यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान लिसेस्टरशायरच्या दुसऱ्या डावात रहाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने 192 चेंडूंत 102 धावा केल्या. रहाणेने या खेळीत 13 चौकार आणि एक षटकारही लगावला. अजिंक्य रहाणेने शतकी खेळी करत आपल्या लिसेस्टरशायर संघाला 300 धावांचा पल्ला गाठून देत मजबूत स्थितीत पोहोचवले.