पहिल्या कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागणाऱ्या पाकिस्तानची दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही अडचणीची स्थिती झाली आहे. खुर्रम शहजादच्या भेदक माऱ्यानंतरही बांगलादेशचा डाव लवकर गुंडाळण्यात अपयशी ठरल्यामुळे पाकिस्तानने कसोटीवरील आपली पकड गमावली. लिटन दासच्या 138 धावांच्या शतकाने बांगलादेशला 6 बाद 26 वरून अनपेक्षितपणे 262 धावांपर्यंत नेले आणि पाकिस्तानला केवळ 12 धावांचीच आघाडी मिळवता आले. त्यातच दिवसअखेर हसन महमूदने पाकिस्तानची 2 बाद 9 अशी बिकट अवस्था केली. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दुसरी कसोटी जिंकून बरोबरी साधणे पाकिस्तानसाठी सोप्पे नसेल.
शाहिन शाह आफ्रिदीला वगळल्यामुळे संघात स्थान मिळवणाऱ्या खुर्रम शहजादने 5 चेंडूंत आघाडीच्या 3 फलंदाजांना टिपत बांगलादेशची 6 बाद 26 अशी दुर्दशा केली होती. मात्र त्यानंतर पाकिस्तानचे गचाळ क्षेत्ररक्षण आणि लिटन दास आणि मेहिदी हसन मिराजने (78) सातव्या विकेटसाठी केलेल्या 165 धावांच्या भागीने बांगलादेशला संकटातून बाहेर काढले. तसेच हसन महमूदसह नवव्या विकेटसाठी लिटनने 71 धावांची भागी रचत आपले चौथे कसोटी शतक साजरे केले. खुर्रमने 90 धावांत 6 विकेट टिपत दुसऱ्या कसोटीतच आपली सर्वोत्तम कामगिरी केली.