मालवणातील शिवपुतळा दुर्घटनेवरून टीकाकारांनी मिंधे सरकारला चारी बाजूंनी वेढा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर पुरते बावरून गेले आहेत. इतके की, आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही अजब पद्धतीने मांडू लागले आहेत. शिवरायांनी सुरत लुटलीच नव्हती, असा दावा त्यांनी आज केल्याने इतिहास अभ्यासकांनाही महाराजांचा इतिहास पुन्हा चाळावा का, असा प्रश्न पडला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने सर्वांना असेच शिकवले की, शिवरायांनी सुरत लुटली होती, पण तसे काहीच झाले नव्हते. शिवरायांनी सुरत लुटलीच नव्हती. त्यांनी केवळ स्वराज्याचा खजिना तेथील काही लोकांकडून परत आणला.
खोटा इतिहास लोकांच्या माथी मारू नका – इंद्रजीत सावंत
छत्रपती शिवाजी महाराजांनी दोनदा सुरत लुटली होती. तुम्ही खोटा इतिहास लोकांच्या माथी मारू नका, अशा शब्दांत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.
फडणवीसांचा हा अक्षम्य गुन्हा
फडणवीसांच्या या अजब इतिहासाबद्दल सर्वांनीच तोंडात बोटे घातली. फडणवीसांनी महाराजांच्या शौर्यावर आक्षेप घेतला आहे, हा अक्षम्य गुन्हा आहे, अशी तोफ महाविकास आघाडीने डागली.