चोरट्यांनी 11 कोटी रुपयांचे दीड हजार आयफोन लांबवले आहेत. चोरट्यांनी ट्रक चालकाला गुंगीचे औषध चारले आणि हे फोन चोरले. मध्य प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी यात गंभीर चूक केली आहे. त्यामुळे एका पोलिस कर्मचाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे.
15 ऑगस्टला एक ट्रक ड्रायव्हर चार हजार आयफोन ट्रकमधून गुरुग्रामवरून चेन्नईला नेत होता. या ट्रक ड्रायव्हरसोबत एक सुरक्षारक्षकही होता. या सुरक्षारक्षकाने ड्रायव्हरला गुंगीचे औषध दिले होते. त्यानंतर आपल्या साथीदारांसोबत मिळून ड्रायव्हरचे हात पाय बांधले आणि ट्रकच्या केबिनमध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर या चोरांनी आयफोन घेतले आणि पोबारा केला.
ड्रायव्हरला शुद्ध आल्यानंतर त्याने कशबशी आपली सुटका करून घेतली. जेव्हा त्याने एकूण आयफोन मोजले तर त्यात दीड हजार आयफोन कमी होते. ड्रायव्हरने पोलिसांकडे याची तक्रार केली पण पोलीस कर्मचाऱ्यांनी ड्रायव्हरची तक्रार गांभीर्याने घेतली नाही. ड्रायव्हरने जेव्हा वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली तेव्हा पोलिसांनी यावर कारवाई केली. हलगर्जी केल्याप्रकरणी त्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.