महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायच काही नावच घेत नाहीत. अशातच आता पश्चिम बंगालमध्ये एका रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. हावडा रुग्णालयाच्या सीटी स्कॅन विभागात रात्रीच्या वेळी एका 13 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
शिबपूर येथील रहिवासी असलेल्या 13 वर्षीय मुलीला 28 ऑगस्ट रोजी न्यूमोनियाच्या तक्रारीवरून हावडा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी रात्री त्यांना सीटी स्कॅनसाठी नेण्यात आले. यानंतर काहीवेळाने मुलगी रडत बाहेर आली. आपल्या मुलीला रडताना पाहून पीडित मुलीच्या आईने तिच्या दिशेने धाव घेतली. यावेळी मुलीची चौकशी केली असता मुलीने सीटी स्कॅन विभागातील कर्मचाऱ्याने आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे पीडितेने आपल्या आईला सांगितले. अमन राज असे त्या आरोपीचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच पीडितेचे कुटुंबीय आणि नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. यावेळी आपल्या मुलीसोबत झालेल्या प्रकरणामुळे त्यांनी रुग्णालयासमोर निदर्शने केली. तसेच जमावाने आरोपीला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडावले आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल असे पोसिसांनी सांगितले.