हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला आहे. सेन्सॉर बोर्डाने अद्याप प्रमाणपत्र न दिल्याने आता या चित्रपटाचे प्रदर्शनही धोक्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी कंगनाच्या चित्रपटावर टीका केली आहे. या चित्रपटाला एसजीपीसीचे प्रमाणपत्र नसेल तर कंगनाचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा चन्नी यांनी दिला आहे.
कॉंग्रेसचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी अभिनेत्री कंगनाचा चांगलाच समाचार घेतला. ‘पंजाब, हरियाणा, हिमाचल हे जुन्या पंजाबचे भाग आहेत आणि येथे राहणाऱ्या प्रत्येकामध्ये बंधुभाव आहे. आमच्यातील परस्पर सामंजस्य कधी बिघडले नाही. आमच्यातील एकता आम्ही कधीही भंग होऊ देणार नाहीत. या एकतेला बाधा आणण्याचा कोणा प्रयत्न करत असेल तर त्याला चोख उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘SGPC प्रमाणपत्र आवश्यक’- चरणजीत सिंह चन्नी
देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंजाबमधील हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे लोक हे प्रेमाने राहत आहेत. आजपर्यंत येथे एकही दंगल झाली नाही. त्यामुळे जर शीखांचा इतिहास दाखवायचा असेल, तर आधी SGPC ची परवानगी घ्यावी. SGPC ही शीख समाजाची आघाडीची संस्था असून तिची परवानगी घेणे आवश्यक आहे. एसजीपीसीच्या परवानगीशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. अभिनेत्री कंगना राणौतचे व्यक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नाही, असेही चरणजीत सिंह चन्नी म्हणाले.