
नांदेड जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून आज रविवारी दुपारपर्यंत पावसाने मध्यम ते जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असला तरी या पावसाने सर्वसामान्य जनता तसेच सखल भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. जिल्ह्यातील 26 मंडळात अतिवृष्टी झाली असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सितानदीला व पैनगंगेला पूर आल्याने नांदेड ते उमरी तसेच नांदेड ते माहूर हा रस्ता बराचवेळ बंद होता. पैनगंगा नदीला पूर आल्याने सहस्त्रकुंड धबधबा आक्राळविक्राळ स्वरुपात आपले रुप धारण करुन आहे.
नांदेड जिल्ह्यात शनिवारी रात्री ते आज दुपारपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात मध्यरात्री सुरु झालेल्या पावसाने सर्वसामान्य जनतेची त्रेधातिरपट उडाली. वसंतनगर, आनंदनगर, देगलूर नाका परिसरातील काही भाग, श्रावस्तीनगर, गोकुळनगर, विष्णूनगर आदी भागात तसेच वजिराबाद भागात रस्त्यावर व गल्लीबोळात पाणी साचल्याने जनतेला कसरत करावी लागत आहे. अनेक भागात रस्त्यांची कामे सुरु असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील सिंदगी भागात 178 मि.मी.पाऊस झाला आहे. तसेच किनवट तालुक्यातील उमरी भागात 160 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 26 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून त्यात हदगाव सर्कल, तळणी ता.हदगाव सर्कल, निवघा ता.हदगाव सर्कल, मनाठा ता.हदगाव सर्कल, तामसा ता.हदगाव सर्कल, पिंपरखेड ता.हदगाव सर्कल, आष्टी ता.हदगाव सर्कल, किनी ता.भोकर सर्कल, किनवट सर्कल, बोधडी सर्कल, इस्लापूर सर्कल, जलधारा, शिवणी, मांडवा, दहेली, सिंदगी, उमरी बाजार, मुदखेड सर्कल, हिमायतनगर सर्कल, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव, सरसम सर्कल, माहूर सर्कल, वानोळा, वाई, सिंदखेड ता.माहूर सर्कल व अर्धापूर सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे नांदेड ते हदगाव, हदगाव ते किनवट या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच सितानदीला आलेल्या पूरामुळे मुदखेड ते उमरी रस्ता पूर्णतः बंद आहे.
जिल्ह्यात रविवारी पडलेला पाऊस मि.मी.पुढीलप्रमाणे. नांदेड-44.70, बिलोली-36.40, मुखेड-24.20, कंधार-20.90, लोहा-31.80, हदगाव-80.60, भोकर-66.50, देगलूर-29.90, किनवट-136.80 (सर्वाधिक पाऊस), मुदखेड-57.50, हिमायतनगर-103.40, माहूर-93.60, धर्माबाद-33.70, उमरी-49.70, अर्धापूर-50.40, नायगाव-45. दरम्यान दोन दिवस आणखी पाऊस जोरात राहणार असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे त्याठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैनात राहण्याच्या सूचना बचाव पथकाना देण्यात आल्याचे जिल्हाधिकार्यांनी सांगितले आहे.
सहस्त्रकुंड धबधब्याने घेतले आक्राळविक्राळ स्वरुप
रात्री पासून नांदेडसह हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे पैनगंगा नदीवरील किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहत आहे. या धबधब्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले असून यावर्षी या भागामध्ये रात्रीपासून पहिल्यांदाच असा मुसळधार पाऊस सुरू असल्याने पावसाळ्यातील पहिल्यांदाच या धबधब्याने आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. हा सहस्रकुंड धबधबा नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याकारणाने हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक या ठिकाणाहून पर्यटक हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. हा सहस्रकुंड धबधबा पाण्याच्या प्रतीक्षेत होता. मात्र रात्री मुसळधार पाऊस झाल्याने हा धबधबा ओसंडून वाहत आहे. नागरिकांनी या परिसरात सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नये, धबधब्याजवळ कोणीही जाऊ नये याची खबरदारी पर्यटकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मुखेड – शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात शनिवार रात्रीपासून व रविवारीही मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेले पिके निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शनिवारी रात्रीपासून व रविवारीही मुखेड व परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामध्ये खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद, कापूस व जवळपास सर्वच लागवडीचे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच शेतातील बांध, कालवे फुटून शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे झालेले नुकसान बघून प्रशासनाने शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
अर्धापुर – तालुक्यात शनिवारी 50 मि.मी.तर अर्धापूर मंडळात 70 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, अर्धापूर तालुक्यात नव्याने सात गांव समाविष्ट मधील रोडगी-खैरगांव पुलावरुन पुर परिस्थिती निर्माण झाल्याने दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. अर्धापुर तालुक्यात काल राञीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वृत लिहितपर्यंत चौदा तास झाले पावसाचा जोर चालुच आहे. पाऊस व पुरामुळे हाती आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुक्रमाबाद-गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे पिके सुकन्याच्या मार्गावर होती. पण शनिवारी सायंकाळपासून सर्वदूर जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने सध्या तरी पिकाला जीवदान मिळल्याने बळीराजा सुखावला आहे. रविवारी जोरदार पावसाचा जोर कायम होता. हा पाऊस शेतकर्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
मुखेड तालुक्यात जुन मध्ये काही मंडळात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्याही वेळेवर झाल्याने आज पीक परिस्थिती चांगली आहे. पण मुक्रमाबादसह परिसरात जून मधील दोन नक्षत्र कोरडे गेल्याने या भागातील पेरण्याही खूप उशीरला झाल्या होत्या. पीक परिस्थिती सध्या तरी जेमतेम आहे. असे असतानाही गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी उन्हामुळे सुकण्याच्या मार्गावर होती. पण हवामानाच्या अंदाजानुसार शनिवारी सायंकाळपासून मुक्रमाबादसह सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्याने सध्या तरी पिकांना जीवदान मिळाले आहे.
जोरदार पावसामुळे केंद्री, तेरू लेंडी या नद्यांना पाणी आले आहे. रविवारी दिवसभर सर्वदूर जोरदार पावसाचा जोर कायम आहे. तीन महिने झाले पावसाळा सुरू होऊन अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने भागातील नद्यांना जेमतेम पाणी होते. यामुळे हा पाऊस फार महत्त्वाचा मानला जात आहे. कारण चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावरच अवलंबून आहे. तसेच पुढील रब्बी हंगाम तूर, कापूस याच पावसावर अवलंबून असल्यामुळे हा पाऊस शेतकर्यांसाठी अति महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. म्हणून नदीकाठच्या शेतकर्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन तलाठी महेश पदाजी यांनी केले आहे.
बिलोली-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 29 ऑगस्ट रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या चार दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. त्याअनुषंगाने दि.31 ऑगस्ट बिलोली तालुक्यात विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चालु असून परिसरातील नाले, ओहोळ तुडुंब भरुन वाहत आहेत. हा पाऊस या वर्षाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे. काढणीला आलेल्या मुग, ऊडीद पिकाला हा पाऊस धोकादायक समजल्या जात आहे. पाऊस ऐवढ्यावर न थांबता पुढील दोन दिवस पडल्यास शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
कुंडलवाडी- शहर व परिसरात सात दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने दि.31 ऑगस्ट रोजी रात्रीपासून जोरदार हजेरी लावली. दि.1 सप्टेंबर रोजी सकाळीही हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार वादळी वार्यासह पाऊस सुरू आहे. पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी केले. शहरातील रस्ते खड्डे झाल्याने अनेक ठिकाणी खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी जमा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले. एक सप्टेंबरच्या सकाळी पाऊस सुरूच असल्याने शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दि.31 ऑगस्ट रोजी रात्रीपासून सुरू झालेल्या वादळी वार्यासह पावसामुळे सोयाबीन पिके आडवी पडत असून हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार पुढील तीन दिवस वादळी वार्यासह पाऊस असल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकरी शंकर पोरडवार यांनी व्यक्त केली आहे. वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे कापून ठेवलेल्या उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच कापूस पिकांंचेही या पावसामुळे नुकसान झाले आहे, अशी माहिती शेतकरी मोहनकुमार जायेवार यांनी दिली आहे.