महाराष्ट्रात शिवद्रोही सरकारच्या विरोधात राज्यभर जोडो मारो आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकरली असली तरी लोकशाहीत जनतेला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे हे आंदोलन होणारच आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले. आम्ही छत्रपती शिवरायांच्या सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी आंदोलम करत आहोत. तर आमच्याविरोधात भाजपवाले आंदोलन करत आहेत. हा हास्यास्पद मूर्खपणा आहे. आमच्याविरोधात भाजपचे शतमूर्ख आंदोलन करत आहेत म्हणजे भाजपवाल्यांचे डोकं फिरलं आहे, हे दिसून येते, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्रात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात येत आहे. याआधी तत्कालीन राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांचा अपमान केला. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. त्यानंतर काही मंत्र्यांनी अवमान केला, त्यांनीही माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, यात दुःख काय करायचे, वाईटातून चांगले घडते, असे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. सरकारच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो आणि वाईटातून चांगले घडते, असे वक्तव्य ते करत आहेत. ही त्यांची विकृती आणि मनोवृत्ती आहे, त्याविरोधात आमचे आंदोलन आहे.
पोलिसांनी परवानगी नाकरली असली तरी हे आंदोलन होणारच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मुंबईत या आंदोलनाची सुरूवात होणार आहे. तसेच राज्यभर ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.
मालवणमध्ये रोजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, यात सरळरसळ भ्रष्टाचार आहे. आपल्या लाडक्या लोकांना कामे देण्याची स्पर्धा सुरू आहे, त्यातून असे प्रकार घडत आहेत. यात राजकीय श्रेयवादाची लढाईही आहे. पंतप्रधान मोदी यांनी याप्रकरणी माफी मागितली असेल, हा त्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रई अजित पवार आणि सरकारमधील इतर काहीजण माफी मागत असतील. मात्र, माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील, तर कोणीही रोखू शकत नाही. सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आहे. लोकशाहीत अशा आंदोलनांना परवानगी द्यावीच लागते.ते परवानगी देत नसतील, तर त्यांची दडपशाही, हुकूमशाही आहे. त्यांच्या मनात हुकूमशाहीची असलेली वृत्ती वाढली आहे.
आम्ही फक्त जोडो मारो आंदोलन करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असता तर त्यांचा कडेलोटच झाला असता. आम्ही आंदोलन करतोय, त्यामुळे भाजपवालेही आंदोलन करत आहेत. हा हास्यापद मूर्खपणा आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करतोय, तर ते आमच्याविरोधात आंदोलन करत आहेत. यावरून त्यांची डोकी फिरली आहेत, हे दिसून येतंय.हे यांचे शिवप्रेम आहे का, असा परखड सवालही त्यांनी केला.