धुळे एक्सप्रेसमध्ये गोमांस घेऊन चालल्याच्या संशयावरून एका वृद्ध प्रवाशाला सहप्रवाशांनी मारहाण केल्याची घटना कल्याणजवळ घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱया प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले आहे. जळगावमध्ये राहणारे अश्रफ अली सय्यद हुसेन (72) त्यांच्या लेकीला भेटण्यासाठी कल्याणला निघाले होते. ते धुळे एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांचा सहप्रवाशांसोबत सीटवरून वाद झाला. अश्रफ अली यांच्याकडे बरणी होती. या बरणीत मांस दिसत होते. त्यावरून सहप्रवाशांनी हुसेन यांना जाब विचारला. मांस कसले आहे? कशाचे आहे? अशा प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर केला. त्यानंतर हुसेन यांना शिवीगाळ करत मारहाणही करण्यात आली. त्यांनी बरणी बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती तुझ्या मांडीवर ठेव अशी धमकीही मारहाण करणाऱया प्रवाशांनी दिली. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी अश्रफ अली सय्यद हुसेन यांना शोधून काढले आणि मारहाण करणाऱया सहप्रवाशांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.