देशात वाघांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे. या वर्षातील अवघ्या चार महिन्यांत 47 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. या वर्षी 1 जानेवारी ते 12 एप्रिलपर्यंत देशात 47 वाघांचा मृत्यू झाला आहे. यात 17 वाघ हे मध्य प्रदेशातील होते तर 11 वाघ हे महाराष्ट्रातील होते. कर्नाटकात 6, उत्तर प्रदेश 3, राजस्थान, केरळ, तेलंगणा आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी दोन आणि छत्तीसगड व ओडिशात प्रत्येकी एक वाघाचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या कारणांनी 181 वाघांचा मृत्यू झाला होता, असेही या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात झाले आहेत. महाराष्ट्रात 45 तर मध्य प्रदेशात 43 झाले होते. उत्तराखंड 21, तामिळनाडू 15, केरळ 14, कर्नाटक 12 आणि आसाममध्ये 10 वाघांचा मृत्यू झाला आहे.