नमाजसाठीच्या ब्रेकवरून एनडीएत फूट; आसाम सरकारच्या निर्णयाला जेडीयूचा विरोध

आसाम सरकारने विधानसभेतील कर्मचाऱ्यांना जुम्मा अर्थात शुक्रवारी मिळणारा दोन तासांचा ब्रेक रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय भाजपच्या चांगलाच अंगलट येताना दिसत आहे. या निर्णयावरून एनडीएत फूट पडली असून आसाम सरकारच्या या निर्णयाला जेडीयूने उघडउघड विरोध दर्शवला आहे.

जेडीयू नेते नीरज कुमार यांनी शनिवारी या निर्णयाचा निषेध करत म्हटले की, हा निर्णय धार्मिक आस्थेवर हल्ला करणारा आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अधिक लक्ष दिले असते तर बरे झाले असते, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा संविधानाच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधात आहे. देशात प्रत्येकाला धार्मिक भावना जपण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असे म्हटले आहे.