प्रचलित कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करणे महागात पडले, खार पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी निलंबित

प्रचलित कायदेशीर कार्यपद्धतीचा अवलंब न करता एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेताना संशयास्पद हालचाल केल्याप्रकरणी खार पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह तिघा अंमलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

समाजमाध्यमावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एका व्यक्तीची दोघेजण अंगझडती घेत असल्याचे व त्यांच्या सोबत अन्य दोघे उभे असल्याचे दिसत आहे. त्या व्हिडीओची वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांकडून शहानिशा केली असता ते चारजण हे पोलीस असून त्यांची नेमणूक खार पोलीस ठाण्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता खार पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक व तीन अंमलदारांनी 30 ऑगस्ट रोजी प्रचलित कायदेशीर कार्यपद्धतीचा अवलंब न करता एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेत असताना  त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने त्या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे परिमंडळ-9 चे उपायुक्त राजतिलक रोशन यांनी सांगितले.