नगर महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रलंबित सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी कर्मचारी युनियनच्या वतीने उपोषण आंदोलन सुरू आहे. आज सहाव्या दिवशी उपोषणकर्ते बाबासाहेब मुद्गल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांची तब्येत खालावली आहे. या आंदोलनाकडे कुणीही लक्ष न दिल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले असून, सोमवारपासून पाणीपुरवठा, स्वच्छता, फायर सुविधा, लाईट, आरोग्यसेवा बंद ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रश्न मार्गी लागला नाही तर सोमवारपासून अन्नाबरोबर पाण्याचाही त्याग करण्याचा इशारा उपोषणकर्ते बाबासाहेब मुद्गल यांनी दिला.
सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे सहाव्या दिवशीही उपोषण सुरूच असून, उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. उपोषणाला कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून महापालिकेसमोर युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुद्गल, जितेंद्र सारसर व बाबासाहेब राशिनकर हे उपोषणाला बसले आहेत. आज सहाव्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे. जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांना उपोषणस्थळीच सलाईन लावण्यात आली, तर बाबासाहेब मुद्गल यांनी सलाईन घेण्यास नकार दिला. उपोषणकर्ते बाबासाहेब राशिनकर यांचा बीपी वाढला आहे. याचबरोबर उपोषणकर्त्यांचे सुमारे 4 किलो वजन घटले असून, शुगर लेवलही खालावली असून, ती साठवर आली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.