दुचाकीच्या टायरमध्ये हवा भरल्यानंतर द्याव्या लागणाऱ्या सुट्या पाच रुपयांवरून झालेल्या वादातून हातकणंगले तालुक्यातील येळगूड येथे टायर पंक्चर काढणाऱ्या दुकानदाराचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना 24 तासांत ताब्यात घेतले.
गिरीष विश्वनाथ पिल्लई (वय 47, मूळ रा. उमानूर, जि. कोलम, केरळ) असे खून झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी नचिकेत विनोद कांबळे (वय 19, रा. शिंगाडे गल्ली, शाहूनगर, हुपरी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचेही सहकार्य मिळाले, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, उपअधीक्षक समीरसिंह साळवे व निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी दिली.
नचिकेत कांबळे व अल्पवयीन मुलगा गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून यळगूडकडे जात होते. दुचाकीत हवा कमी असल्याने ती भरण्यासाठी दोघे गिरीश पिल्लई यांच्या जवाहर साखर कारखाना पेट्रोल पंपासमोरील दुकानात गेले होते.
हवा भरून झाल्यानंतर पाच रुपये देण्यासाठी नचिकेतने 500 रुपयांची नोट दिली. यावेळी सुटे पैसे देण्याच्या कारणावरून तिघांत वाद झाला. यावेळी नचिकेतने दुकानातील लोखंडी टॉमीने गिरीश यांच्या डोक्यावर वार केला. यात जखमी होऊन गिरीश खाली पडताच अल्पवयीन मुलाने त्याच्याजवळील सुऱ्याने त्याच्या पोटात दोन वार केल्याने गिरीश जागीच ठार झाले.
या घटनेच्या तपासासाठी हुपरी पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषणचा सहभाग असणारी तीन स्वतंत्र पथके कार्यरत करून तपास करण्यात आला. पोलिसांनी अनेक अंगाने तपास करीत दोघांना चौकशीसाठी रात्री ताब्यात घेतले होते. चौकशीवेळी या दोघांनी खून केल्याची कबुली दिली आहे.