कोट्यवधी रुपये खर्च करूनही अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष, जबाबदार लोकप्रतिनिधींची टक्केवारी आणि ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शहरातील रस्त्यांवर सध्या जिकडे-तिकडे खड्डेच खड्डे झाले आहेत. दररोज छोट्या-मोठ्या अपघाताने नागरिक त्रस्त झाले आहेत. या खड्ड्यात पडून जखमी झालेल्या एका तरुणाने चक्क महानगरपालिकेसमोरच एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून, प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारला. या उपोषण आंदोलनाची शहरात जबरदस्त चर्चा सुरू होती.
खड्डे प्रश्नावरून अनेक आंदोलने झाली. तरीसुद्धा तात्पुरते बुजवलेले खड्डेही पुन्हा उघडे पडत आहेत. अशाच खड्ड्यात पडून हात मोडून जखमी झालेल्या शाहुपुरी कुंभार गल्ली येथील अरविंद आरेकर या तरुणाने थेट महापालिकेजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसाचे उपोषण करीत शहरातील रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधले.
शहरातील खड्डे ताबडतोब बुजवा, आरेकर यांना झालेल्या अपघाताची नुकसानभरपाई द्या, वाहनाचे व शरीराचे नुकसान झाले तर जबाबदारी घेऊन महापालिकेने नुकसानभरपाई द्यावी व त्याची योजना 15 दिवसांत जाहीर करावी, अशा मागण्या अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याकडे यावेळी श्रमिक संघाच्या शिष्टमंडळाने केली.