छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या शिवद्रोही सरकारला आज जोडे मारा! महाविकास आघाडीचे महाआंदोलन

महाराष्ट्रद्रोही मिंधे-भाजप सरकारचा निर्लज्ज भ्रष्टाचार आणि अक्षम्य बेजबाबदारपणामुळे मालवणच्या राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे मराठी मनावर प्रचंड वज्राघात झाला आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या संतापाचा कडेलोट झाला असून महाराष्ट्रद्रोह्यांना माफ करणार नाही, असा वज्रनिर्धार करीत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या शिवद्रोही सरकारला महाविकास आघाडीकडून आज रविवार, 1 सप्टेंबर रोजी ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या घोषणेने नेभळट सरकारची तंतरली असून आंदोलनाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही आंदोलन होणारच, असा एल्गार महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. फोर्ट येथील हुतात्मा स्मारक चौक येथे अभिवादन करून गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ ‘शिवद्रोही’ सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करणार आहेत. सकाळी 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल. या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.

सिंधुदुर्गातील मालवण-राजकोट येथे लोकसभा निवडणुकीआधी  श्रेय लाटण्याच्या उद्देशाने घाईघाईने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळय़ाचे लोकार्पण मिंधे-भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते केले. निवडणुकीआधी महाराजांचा पुतळा उभारल्याची शेखी सरकारकडून वारंवार मिरवली जात होती.मात्र अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्यामुळे मिंधे-भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली आहे. शिवाय महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून ‘शिवद्रोही’ सरकारला ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे सर्व घटकपक्ष आणि शिवप्रेमी जनता हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहे.

लोकशाहीत जनतेचा आंदोलनाचा अधिकार का डावलता? – संजय राऊत

शिवद्रोही सरकारविरोधात महाविकास आघाडीने पुकारलेल्या सरकारला जोडे मारा आंदोलनासाठी परवानगी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी चांगलाच टोला लगावला आहे. लोकशाहीत जनतेचा आंदोलनाचा अधिकार कसा डावलता, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. जनता त्यांच्या मनातील रोष व्यक्त करणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला परवानगी नाकारण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच शांततेने करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी परवानगी मागण्याचीही गरज नसल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळे रविवारी हे आंदोलन होणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आंदोलन रविवारी होत आहे. फोर्ट, गेट वे ऑफ इंडियाचा परिसर सुट्टीच्या दिवशी शांत असतो. तिथे कोणत्याही घडामोडी नसतात. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी एकत्र येण्यासाठी परवानगी का हवी, असा सवालही त्यांनी केला.

महाविकास आघाडीची जय्यत तयारी

या आंदोलनात शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने सहभागी होतील. शिवाय काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेदेखील सहभागी होणार असल्याचे मुंबई राष्ट्रवादी अध्यक्षा राखी जाधव यांनी सांगितले.

सरकारला जोडे मारा आंदोलनासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. यावेळी आंदोलकांच्या हाती सरकारच्या निषेधाच्या घोषणा असलेले फलक तर मुखामध्ये शिवरायांचा जयजयकार आणि सरकारच्या धिक्काराच्या घोषणा असतील.

तांडव सा युद्ध करयुद्ध कर भयंकर!

शिवद्रोही मिंधे-भाजप सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा तीव्र आंदोलनाने समाचार घेण्यात येणार आहे. यासाठी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेला टीझर सोशल मीडियात तुफान व्हायरल होत असून आंदोलकांमध्ये स्फुरणच चढत आहे. शिवद्रोह्यांना धडा शिकवण्यासाठी ‘तांडव सा युद्ध कर… युद्ध कर भयंकर! शिवद्रोह्यांना माफी नाहीच… चला, शिवद्रोही सरकारला व महाराष्ट्रद्रोहय़ांना जोडे मारण्यासाठी… असा आक्रमक संदेश टीझरमधून देण्यात आला आहे.

स्थळ – हुतात्मा स्मारक चौक ते गेट वे ऑफ इंडिया

वेळ – सकाळी 10 वाजता