वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम वादात आणि चर्चेत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांची एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने चांगलीच जिरवली. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये शासकीय विश्रामगृहात घडलेल्या प्रकाराची सोशल मीडियावर आता जोरदार चर्चा आहे. ही घटना गुरुवारी 29 ऑगस्ट 2024 ला घडली.
प्रक्षोभक वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करू नका, अशी नोटीस देण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक संजय हारुगडे आणि भाजप आमदार नीतेश राणे यांच्यात यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. हा प्रकार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील शासकीय विश्रामगृहात घडला. यामुळे काहीकाळ तणावचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी त्याठिकाणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यात मध्यस्थी करून हा बाद मिटविला.
नीतेश राणे हे हिंदू जनआक्रोश मोर्चासाठी गुरुवारी इस्लामपुरात आले होते. मोर्चा सुरू होण्यापूर्वी ते येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. राणे यांच्या इस्लामपूर दौऱ्याला काही संघटनांनी विरोध दर्शविला होता. तसेच त्यांना प्रक्षोभक भाषणापासून रोखा, अशी मागणी पोलिसांकडे केली होती. त्यामुळे नितेश राणे यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात ठीकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या सभेत प्रक्षोभक वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करू नका, अशी लेखी सूचना नितेश राणे व प्रमुख वक्त्यांना देण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय हारुगडे आपल्या सहकाऱ्यांसह विश्रामगृहात गेले होते.
नितेश राणे यांना नोटीस देत असताना ‘तू कोणाला नोटीस देतोयस? त्या मुस्लिमांना नोटीस दे जा. मी नोटीस घेत नाही. दे तिकडे फेकून’, अशी एकेरी भाषा नितेश राणे यांनी पोलिसांना वापरली. यावर निरीक्षक हारुगडेही आक्रमक झाले. त्यांनीही भाषा सांभाळून वापरा. मी पण असे लईजण बघितल्यात. मी नोकरीची पर्वा करीत नाही. तुला काय करायचे ते कर’ असे प्रत्युत्तर दिले. शब्दाने शब्द वाढत जाऊन वातावरण तणावपूर्ण बनले होते. आक्रमक पवित्र्यानंतर उपस्थितांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तेथील उपस्थित काही नेतमंडळीनी मध्यस्थी करीत हा बाद मिटविला. यानंतरही नीतेश राणे यांनी नोटीस स्वीकारलीच नाही. त्यामुळे अन्य वक्त्यांना नोटीस देऊन पोलिस माघारी परतले. या प्रकाराची गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावरही
चर्चा सुरू होती.
समाजात जाणीवपूर्वक कोणी तेढ निर्माण करीत असेल, तर त्याला सूचना करणे पोलिसांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडायला गेलो होतो. आजच्या घटनेचा सर्व अहवाल बरिष्ठांना पाठविण्यात येईल, ज्यांनी कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांच्यावर वरिष्ठांचा सल्ला घेऊन गुन्हा दाखल होईल.
– संजय हारुगडे, पोलिस निरीक्षक