नांदेड जिल्हा एकेकाळी शिवसेनेचा मजबूत गड राहिला आहे, एकेकाळी चार आमदार आपल्या पक्षाचे होते. येणार्या काळात संघटनेची मजबूत ताकद खेड्यापाड्यात निर्माण करून पुन्हा एकदा शिवसेनेचे गतवैभव निर्माण करून द्या, आपण एका विचाराने लढत आहोत आणि विधानसभेची लढाई आपल्याला जिंकायची आहे, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागीय नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
नांदेड जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी अंबादास दानवे यांचे दुपारी नांदेड येथे आगमन झाले. त्यानंतर पक्षाच्या आढावा बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. शिवसेनेने नांदेड जिल्ह्याला एकेकाळी चार आमदार निवडून दिले. आजही शिवसैनिक जागीच आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद व अन्य संस्थांमध्ये देखील शिवसेनेचा दरारा होता. नांदेडचा पहिला महापौर देखील आपलाच होता. अशा परिस्थितीत येणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता कंबर कसून कामाला लागायचे आहे, असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले.
बुथप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख यांच्या नेमणुका लवकरात लवकर करण्यात याव्यात. गावपातळीवर शिवसेनेचे संघटन बांधण्यासाठी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, तालुकाप्रमुख व जिल्हाप्रमुखांनी कंबर कसून आता कामाला लागायचे आहे. महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्र स्वाभिमानाचा विचार घेवून जाणारी शिवसेना ही संघटना आहे. शिवसैनिकांमध्ये परिवर्तन करण्याची ताकद असून संघटनात्मक बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न करा. जो परिश्रम करतो त्याला नियती थांबू शकत नाही. क्रांती सर्वसामान्य घडवत असतात, नांदेड जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती यापूर्वीही होती आणि आजही आहे. ही क्रांती घडविण्यासाठी आता आपल्याला सिद्ध व्हायचे असून विधानसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्याने अभूतपूर्व यश मिळविण्यासाठी कंबर कसली पाहिजे, असे अंबादास दानवे म्हणाले.
सातत्याने काम करत राहिल्यास व जनतेच्या संपर्कात राहिल्यास आपल्याला यश हे मिळणारच, असा विश्वास व्यक्त करून नांदेड जिल्ह्याला गतवैभव निर्माण करण्यासाठी कंबर कसून कामाला लागा. निश्चितच यश तुमच्या पदरात आहे, असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पदाधिकार्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी सबंध जिल्ह्याचा आढावा घेवून येणार्या काळात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले. जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख प्रमोद उर्फ बंडू खेडकर, जिल्हाप्रमुख माधवराव पावडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास लातूरचे संपर्कप्रमुख रोहिदास चव्हाण, राज्य संघटक एकनाथ पवार, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, भुजंग पाटील, धोंडू पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती. तिन्ही जिल्हाप्रमुखांनी आपल्या कामाचा अहवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे सादर करुन बुथनिहाय कमिट्यांची माहितीही दिली. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. रात्री उशिरापर्यंत विविध मतदारसंघाचा आढावा अंबादास दानवे यांनी घेवून पदाधिकार्यांना योग्य त्या सूचना त्यांनी केल्या.