सरकारची नवीन ‘फरार व्हा योजना’; जितेंद्र आव्हाड यांची सडकून टीका

गजापूर विशाळगड प्रकरण, बदलापूरमध्ये शाळकरी मुलींचे लैगिंक शोषण आणि नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापले आहे. मात्र सरकारी यंत्रणा हातावर हात ठेवून बसल्या आहेत आणि आरोपी फरार होत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सराकारवर निशाणा साधत ही सरकारची नवीन ‘फरार व्हा योजना’ असल्याचा टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट (X) करत सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, गजापूर, विशाळगडमध्ये एवढे मोठे प्रकरण घडले, आरोपी फरार. बदलापूरच्या शाळेत चिमुरड्यांचे लैंगिक शोषण झाले, आरोपी संस्थाचालक फरार. छत्रपती शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा बनवला, आरोपी शिल्पकार फरार. तुम्ही बलात्कार करा; तुम्ही दंगली घडवा. पण, तुम्ही जर आमची माणसे असाल तर बिनधास्त रहा; तुम्हाला फरार करून टाकू. ही सरकारची नवीन “फरार व्हा योजना” आहे, असे आरोप जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर केले आहेत.