डहाणू ते नाशिक व्हाया त्र्यंबकेश्वर चला रेल्वेने

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची बाराही महिने गर्दी असते. प्रभू रामचंद्र जेथे वनवासात राहिले त्या नाशिकमधील पंचवटीलाही असंख्य भाविक भेट देतात. पश्चिम रेल्वेमार्गावरील विरार, सफाळा, वैतरणा, पालघर, बोईसर, डहाणू येथील भाविकांना आणि प्रवाशांना आता लवकरच डहाणू येथून थेट नाशिकला रेल्वेने जाता येणार आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा नवा रेल्वेमार्ग लवकरच आकाराला येणार आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील अनेक शहरे जोडली जातील आणि त्यामुळे तेथील विकासाला चालना मिळून आर्थिक उलाढालही वाढेल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला.

शंभर किलोमीटरचा रेल्वेमार्ग
त्र्यंबकेश्वर आणि वाणगावमार्गे नाशिक ते डहाणू हा शंभर किलोमीटरचा रेल्वेमार्ग दोन प्रमुख शहरांना जोडणार आहे. या रेल्वेमार्गामुळे कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होऊन महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासाचे एक नवे दालन खुले होणार आहे. या रेल्वेमार्गाच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने अडीच कोटी रुपये मंजूर केले असून या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही रेल्वे खात्याने दिली आहे.