>> वर्षा चोपडे
एखाद्या गावचे गणपतीचे मंदिर प्रसिद्ध असते. परंतु आंध्र प्रदेशातील चित्तूर जिह्यातील कनिपाकम येथे विहिरीतील गणपती प्रसिद्ध आहे. गणपतीच्या मूर्तीशी संबंधित कथा, लोकप्रथा यांच्याशी जोडलेले हे मंदिर बघावे असेच आहे.
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिह्यातील कनिपाकम येथील विहिरीतील गणपती. वेगळं वाटतंय ना… पण हो विनायक मंदिर किंवा श्री वारासिधी विनायक स्वामी मंदिर या हिंदू मंदिरातील गणेश मूर्ती चक्क विहिरीतील पाण्यात आहे. कनिपाकमचा अर्थ ‘कणी’ म्हणजे आर्द्र प्रदेश आणि ‘पाकम’ म्हणजे ओल्या जमिनीत पाण्याचा प्रवाह असा होतो. हे मंदिर चित्तूरपासून 11 किमी आणि तिरुपतीपासून जवळजवळ 68 किमी अंतरावर आहे. पौराणिक कथेनुसार मूक, बहिरे आणि आंधळे असे तीन शेतकरी भाऊ होते. ते त्यांच्या शेतात मुबलक पाणी लागावे याकरिता विहीर खोदत होते. विहीर खोदत असताना कुऱ्हाडीचा घाव एका कठीण दगडास लागला व त्यांनी आणखी खोदले असता दगडातून रक्त वाहू लागले. ते तिघे हा काय प्रकार आहे हे न समजल्यामुळे खूप घाबरले, परंतु उत्सुकतेमुळे त्यांनी देवास प्रार्थना करून व्यवस्थित खोदले असता ती गणेश मूर्ती असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी गणेशाला वंदन केले आणि आशीर्वाद मागितला. असे म्हणतात की, गणेश देवता प्रसन्न झाली आणि तिघांचीही अपंगत्वातून सुटका झाली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन स्वयंभू गणेशाचे दर्शन घेतले. नवलाई म्हणून गावकऱ्यांनी आणखी खोदले, पण त्यांना गणेश देवतेचा तळ सापडला नाही. जयघोष करीत श्रीगणेशाची मूर्ती गावकऱ्यांनी उचलून धरली, परंतु ती काही हलेना. गावकऱ्यांनी मूर्ती हलवण्याचा प्रयत्न केला असता परत रक्तस्राव सुरू झाला. मग तिथेच मंदिर बांधण्याचा संकल्प केला गेला आणि श्री गणेशाचे छोटे मंदिर बांधून शास्त्रोक्त पूजाविधी सुरू झाले.
गणेश मूर्तीच्या अचल स्थितीमुळे लोक इथे दर्शनासाठी गर्दी करतात. कारण आजही नेहमी पाण्याने भरलेल्या विहिरीत गणेश देवता विराजमान आहे. पण ती मूर्ती खालपर्यंत किती खोल आहे याचा अंदाज लागू शकलेला नाही. हे मंदिर 11व्या शतकाच्या पूर्वार्धात चोल सम्राट कुलोत्तुंगा प्रथम याने सुबक दक्षिण शैलीत बांधले होते आणि 1336 मध्ये विजयनगरच्या सम्राटांनी त्याचा आणखी विस्तार केला होता. मंदिर आंध्र प्रदेशच्या एंडोमेंट्स विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. आजही मूर्ती मूळ विहिरीत असून विहिरीचे झरे अखंड आहेत. पावसाळ्यात विहिरीतील पवित्र पाणी ओसंडून वाहते.
मूर्तीचे दुसरे आश्चर्यकारक वैशिष्टय़ म्हणजे ती अजूनही आकाराने वाढत आहे. सध्या मूर्तीची मांडी आणि पोट बघायला मिळते. देवस्थान भक्तनिवासात सर्व यात्रेकरू वा दर्शनार्थी भाविकांची राहण्याची सोय आहे. कनिपाकमजवळ अनेक प्रमुख भेट देणारी ठिकाणे आहेत.
आपल्या महाराष्ट्रातही अनेक प्रसिद्ध गणेश मंदिरे आहेत. प्रत्येक गणेश मंदिराची कहाणी निराळी आहे आणि मूर्ती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात 17व्या शतकातील संत समर्थ रामदास यांनी रचलेली ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही मराठी आरती देश-विदेशात गायली जाते. महाराष्ट्रात गणेश उत्साह शिगेला पोहोचलेला असतो, पण इतर राज्यांतही गणेश उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. तसेही बापा विश्वमय झालाय. मराठी लोक ज्या-ज्या ठिकाणी आहेत तेथे हा सण साजरा तर होतोच, पण हिंदुस्थानातील दक्षिणेतील तामीळनाडूमध्ये हा सण विनायक चतुर्थी किंवा पिल्लयर चतुर्थी म्हणून ओळखला जातो. तामीळ कॅलेंडरमध्ये अवाणी महिन्यातील अमावस्येनंतरच्या चौथ्या दिवशी गणपतीचे आगमन होते.
या राज्यात सर्वत्र मूर्ती सामान्यत मातीच्या बनविल्या जातात. कारण राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने 2004 मध्ये असा निर्णय दिला की, गणेश मूर्तींचे विसर्जन बेकायदेशीर आहे. कारण त्यात समुद्राचे पाणी प्रदूषित करणारी रसायने समाविष्ट आहेत. पर्यावरणाच्या चिंतेमुळे गुजरातमधील लोक शेण आणि मातीच्या मिश्रणाने बनवलेल्या गणेश मूर्तींची निवड करण्यास प्रवृत्त करत आहेत. महाराष्ट्रातही शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले जाते. विसर्जनानंतर समुद्र किनारी वाहत आलेल्या गणेश मूर्तीचे हाल बघवत नाही. श्रद्धा असली तर सुपारीचीही गणपती करून पूजा केली तर बाप्पा पावेल. त्याकरिता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती स्थापन करून पर्यावरणाचे गुन्हेगार ठरू नका. निसर्ग हेच देवतेचे स्वरूप आहे. देव काय आहे हे सर्वप्रथम समजून घ्या. कुठलाही देव प्रदूषणाचे राक्षसी रूप मान्य करणार नाही. देवावर खरंच श्रद्धा असेल तर प्रदूषणमुक्त सण साजरे करा आणि देशाला आणि पर्यावरणाला आरोग्यदायी बनवण्यास हातभार लावा.
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)