>> दिलीप ठाकूर
दिग्दर्शिका नम्रता राव हिची सलीम–जावेद या सर्वाधिक चर्चित ठरलेल्या जोडीवरची माहितीपट मालिका सध्या चर्चेत आहे. या जोडीने अनेक चित्रपट गाजवले. सलीम–जावेद जोडीने स्वतंत्रपणे केलेला प्रयत्न व प्रवास हादेखील कुतूहलाचा विषय आहे.
चित्रपट माध्यमात गोष्टीनुसार पटकथा व चित्रीकरणावरचे संकलन या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात आणि हुशार दिग्दर्शक यावर जास्त लक्ष केंद्रित करतो. पटकथाकार सलीम-जावेद ही जोडी यात सर्वाधिक बहुचर्चित ठरली आहे. दिग्दर्शिका नम्रता राव हिची याच जोडीवरची माहितीपट मालिका सध्या चर्चेत आहे.
याच निमित्ताने काही वेगळे सांगायचे तर… या जोडीबद्दलच्या अनेक गॉसिप्सपैकी एक म्हणजे जावेद अख्तर यांच्याकडे पटकथा लेखनाची शैली तर सलीम खान निर्मात्यांशी व्यावसायिक बोलणी करणे, नवीन चित्रपट साइन करणे हे गुण असल्याची कुजबुज होती. ते दोघे स्वतंत्रपणे काम करू लागल्यावर जावेद अख्तर सुरुवातीस आघाडीवर असल्याचे आणि सलीम खान मागे पडल्याचे चित्र होते.
पटकथा लेखक म्हणून दबदबा असतानाच जावेद अख्तरनी यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’पासून (1981) गीत लेखनही सुरू केले. हे सलीम खानना आवडले नसल्याचीही कुजबुज होती. स्वतंत्र काम करताना जावेद अख्तर यांचा पहिला चित्रपट होता राहुल रवैल दिग्दर्शित ‘बेताब’ (1983). त्याची पहिली ट्रायल पाहून धर्मेंद्रने काही बदल सुचवताना म्हटले, “पिक्चर दिल से बनती है, पैसे से नहीं.” त्यानंतर ‘बेताब’चे तब्बल चाळीस दिवसांचे रिशूट झाल्याचा किस्सा आजही सांगितला जातो. जावेद अख्तर यांनी स्वतंत्रपणे वाटचाल करताना रमेश तलवार दिग्दर्शित ‘दुनिया’ (सूडनायक), यश चोप्रा ‘मशाल’ (याची कथा ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकावरून बेतली होती), रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘सागर’, राहुल रवैल दिग्दर्शित ‘अर्जुन’ व ‘डकैत’, सुभाष घई दिग्दर्शित ‘मेरी जंग’, टीनू आनंद दिग्दर्शित ‘मैं आझाद हूं’ (‘मीट जॉन डो’ या विदेशी चित्रपटावर आधारित), राकेश रोशन दिग्दर्शित ‘खेल’ आणि सतीश कौशिक दिग्दर्शित ‘रूप की रानी चोरों का राजा’ हे चित्रपट मध्यंतरापर्यंत जवळपास सारखेच आहेत. फरक फक्त भव्यदिव्य सेटस्चा. सतीश कौशिक दिग्दर्शित ‘प्रेम’, प्रियदर्शन दिग्दर्शित ‘कभी ना कभी’, फरहान अख्तर दिग्दर्शित ‘लक्ष्य’ आणि
‘डॉन- द चेस बिगिन अ गेम’ (हा ‘डॉन’चा स्टायलिश व चकाचक रिमेक), राहुल रवैल दिग्दर्शित ‘जीवन एक संघर्ष’ (‘दीवार’ची बोथट रिमेक). जावेद अख्तर स्वतंत्रपणे ‘बेताब’ व ‘सागर’ वगळता फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत. गीतकार म्हणून ते जास्त प्रभावी ठरले. तीच त्यांची नंतरच्या पिढीला ओळख.
सलीम खान यांचेही प्रगतीपुस्तक फार लक्षवेधक नाही. सलीम खान व जावेद अख्तर एकत्र येण्यापूर्वी त्यांनी ब्रिज दिग्दर्शित ‘दो भाई’चे (1969) लेखन केले आणि स्वतंत्र झाल्यावर महेश भट्ट दिग्दर्शित ‘नाम’ आणि शशिलाल नायर दिग्दर्शित ‘फलक’ (या दोन्हीवर ‘दीवार’चाच प्रभाव स्पष्ट दिसतो), राजेश सेठी दिग्दर्शित ‘अंगारे’, महेश भट्ट दिग्दर्शित ‘कब्जा’ आणि ‘जुर्म’, केतन देसाई दिग्दर्शित ‘तुफान’, रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘अकेला’, राहुल रवैल दिग्दर्शित ‘मस्त कलंदर’ याशिवाय अन्य दिग्दर्शकांसाठी ‘मंजधार’, ‘पत्थर के फूल’, ‘आ गले लग जा’, ‘दिल तेरा दीवाना’ हे चित्रपट लिहिले.
याचाच अर्थ असा की सलीम खान आणि जावेद अख्तर स्वतंत्रपणे पटकथेत फार प्रभाव दाखवू शकले नाहीत. दोघांनीही त्यानंतर थांबणेच पसंत केल्याचे दिसत आहे. युवा पिढीतील एकाही दिग्दर्शकाला आपण त्यांच्या पटकथेवर चित्रपट करावा असे का वाटले नसावे?
एकत्र लेखन सुरू ठेवले असते तर आणखी काही बंदिस्त पटकथा, प्रभावी व्यक्तिरेखा लेखन आणि अर्थपूर्ण संवाद या गुणांवर त्यांचे चित्रपट यशस्वी ठरले असते. तरी दोन प्रश्न आहेतच. त्यांचे काही चित्रपट हे जुन्या चित्रपटांची नवीन शैलीतील अधिकाधिक चांगली बंदिस्त मांडणी होते (‘राम और श्याम’वरून ‘सीता और गीता’, ‘सेव्हन समुराई’ व ‘मेरा गाव मेरा देश’वरून ‘शोले’, ‘दो उस्ताद’वरून ‘हाथ की सफाई’, ‘वक्त’वरून ‘यादों की बारात’ वगैरे), तर काही दिग्दर्शकांनी त्यांच्या पटकथेवरील चित्रपट यशस्वी ठरूनही त्यांच्यासोबत पुन्हा काम का केले नाही? नासीर हुसेन (यादों की बारात), मनमोहन देसाई (चाचा भतीजा), रवी टंडन (मजबूर), मनोज कुमार (क्रांती), राज खोसला (दोस्ताना) ही उदाहरणे आहेत. प्रकाश मेहरांनीही ‘जंजीर’ व ‘हाथ की सफाई’नंतर त्यांची साथ सोडली.
पटकथा लेखन कसे असावे हे त्यांचेच ‘दीवार’ व ‘डॉन’ पाहून शिकता येते. त्यांनी पटकथा लेखकांना ग्लॅमर आणले (फार पूर्वीच्या चित्रपटांत लेखन म्हणून ‘स्टोरी डिपार्टमेंट’ असे श्रेयनामावलीत दिसत असे), आपला स्वतचा दबदबा निर्माण केला, त्यांच्या दमदार संवादाचीही ध्वनिमुद्रिका गाजली (शोले) या जमेच्या बाजू आहेत आणि तीच त्यांची ओळख. तरीही ते स्वतंत्र झाल्यावर फार काही घडल्याचे पडद्यावर तरी दिसले नाही.
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)