नवी मुंबईत भाजप-मिंधे पुन्हा आमनेसामने, 14 गावांच्या समावेशाला माझा विरोध; तुमच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगा! – गणेश नाईक

कल्याण लोकसभा मतदारसंघातील 14 गावांचा समावेश नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिकेमध्ये केला असला तरी या गावांमध्ये एक रुपयाही खर्च करू नका. या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करून घेण्यात माझा विरोध आहे, हा माझा निरोप तुमच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगा, असा संताप ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये विकासकामांसाठी खर्च करायचा की नाही, असा पेच पालिका प्रशासनापुढे उभा राहिला आहे.

नाईकांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यामुळे मिंधे गटाचे पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईत भाजप आणि मिंधे गट पुन्हा आमनेसामने आल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम वाढला आहे.

कल्याण लोकसभा क्षेत्रात असलेली ही 14 गावे पूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात होती. मात्र मालमत्ता कराच्या वादातून या गावांनी महापालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र आता या गावांचा पुन्हा महापालिकेत समावेश व्हावा यासाठी मिंधे गटाने जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यानुसार राज्याच्या नगरविकास विभागाने मार्च 2024 मध्ये या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला.

आठवडाभरापूर्वी या गावांच्या संपूर्ण नियोजनाचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे सोपवण्यात आले. मात्र सरकारच्या या निर्णयाला ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. महापालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत त्यांचा संताप उफाळून आला. या गावांच्या विकासासाठी एक रुपयाही खर्च केला तर याद राखा, माझा या 14 गावांना नवी मुंबईत पालिकेत घेण्यास विरोध आहे, हे तुमच्या मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगा, असे नाईक यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. या बैठकीला आयुक्तांसह सर्वच अधिकारी उपस्थित होते.