>> तुषार प्रीती देशमुख
तिच्या 180 चौरस फुटांच्या दुकानातली दर्जेदार मिठाई ती जगभर पोहोचवते आणि हीच तिची खरी ओळख. सणवार म्हटलं की, मिठाई खरेदीसाठी तिच्या दुकानासमोर भल्यामोठ्या रांगा लागलेल्या असतात. अशा वेळी तिच्या दुकानातील सर्व कामगारांबरोबर तीदेखील दिवसरात्र काम करते. कोणताही ग्राहक कधीच नाराज होऊ नये व त्यांना चांगल्या दर्जाची मिठाई सदैव मिळावी ही मनीषा बाळगणारी, त्यासाठी दिवसरात्र कष्ट करून ती पूर्ण करणारी व्यक्ती म्हणजे मनीषा मराठे!
मनीषाताई शाळेत असताना प्रचंड खोडकर होती, पण तितकीच अभ्यासू आणि हुशारही होती. मैदानी खेळ असो वा इनडोअर गेम्स, नृत्य असो वा नाटक, ती सगळ्यांत भाग घेऊन बक्षीस पटकवायची, त्याचबरोबर इतरांनाही पुढे जाण्यासाठी प्रेरित करायची. लहानपणापासूनची तिची ही वृत्ती, हे संस्कार तिला तिच्या आजी व आई उषा शशिकांत मंत्री यांनी दिले. आईने परिचारिका म्हणून अनेकांची सेवा करत आपले आयुष्य सेवेच्या कार्यात अर्पण केले आहे. हीच सेवावृत्ती मनीषाताईने जोपासली. वडील शशिकांत मंत्री यांच्याकडून निस्वार्थपणे ‘देणाऱ्याने देत जावे’ हा गुण तिच्या अंगवळणी पडला.
स्वरक्षणासाठी जुडो-कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट पटकावणारी, कबड्डी खेळताना मैदान गाजवणारी आणि बॅडमिंटन खेळता खेळता लग्नाच्या बेडीत अडकणाऱ्या मनीषाला शेषनाथ मराठे यांनी बॅडमिंटन कोर्टमध्येच लग्नाची मागणी घातली होती.
गावाहून मुंबईत येऊन समुद्रावर चणेविक्री करून दामोदर कृष्णाजी मराठे यांनी डेअरी व्यवसायात पदार्पण केले. असंख्य अडीअडचणींना सामोरे जात, खचून न जाता त्यांनी त्यांच्या व्यवसायात प्रगती केली. 1995 साली त्यांनी पत्नी सरोज दामोदर मराठे यांच्या नावाने सरोज स्वीट्स या मिठाईच्या दुकानाची स्थापना केली. 1983 साली त्यांच्या मुलाने, शेषनाथ मराठे यांनी व्यवसायाची धुरा सांभाळली. शेषनाथ यांनी दादर येथील कॅटरिंग कॉलेजमधून प्रशिक्षण घेऊन वडिलांनी मेहनतीने सुरू केलेल्या व्यवसायाचा दर्जा उच्च स्तरावर नेऊन ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत केली. सुरुवातीपासूनच दुकानात मिठाई घेण्यासाठी भल्यामोठय़ा रांगा लागायच्या. कारण या दुकानातील मिठाई म्हणजे उच्च दर्जाची आणि सर्वांना परवडेल इतक्या किमतीची आहे. हीच खासीयत चेंबूरमधील सरोज स्वीट्स या दुकानाचीही आहे.
मनीषाताईने लग्नानंतर घरातल्या स्वयंपाकघराची जबाबदारी सासूबरोबर स्वीकारली, पण त्याबरोबर तिचे सगळे लक्ष चेंबूरच्या व्यवसायापुरते न राहता तो जगभर कसा वाढेल यावर असायचं. कालांतराने मनीषाताईने आपल्या व्यवसायात पतीला साथ देण्याचं ठरवलं. तिच्या प्रेमळ व मृदू स्वभावामुळे ती अनेकांशी जोडली गेली. सरोज स्वीट्समधील मिठाई जगभर पोहोचू लागली. सामाजिक संस्थांपासून ते भल्यामोठय़ा कार्यक्रमांमध्ये तिची उपस्थिती प्रेरणादायी असते. मनीषाताई घरी सुग्रास स्वयंपाक तयार करूनच मग स्वत गाडी चालवत सगळ्या ठिकाणी वेळेवर पोहोचते. तिच्या गाडीमध्ये कायम खाण्याचे पदार्थ व पाण्याच्या बाटल्या असतात. ट्रफिक पोलीस, इतर पोलीस, गरजू यांना प्रवास करताना ती नेहमीच त्या देत असते. सामाजिक बांधिलकी जपणारी, दुकानातील 70 कामगारांची देखभाल करणारी, त्यांना प्रेमाने समजून घेणारी, पण त्याच वेळी कामाच्या बाबतीत शिस्त बाळगून कठोर भूमिका घेणारी, वेळप्रसंगी आपल्या कामगारांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणारी, समाजात शक्यतो कोणी उपाशी राहू नये यासाठी कार्यरत असणारी, अनेक आजी-आजोबांना वृद्धाश्रमात प्रेमाने खाऊ घालणारी, स्वतवर आलेल्या संकटांना हसतमुखाने सामोरे जाणारी अशी ही कणखर, प्रेमळ मनीषा ताई.
मिठाईचे उत्पादन व मिठाईची गुणवत्ता ही सर्व जबाबदारी शेषनाथ यांच्याकडे, मिठाईसाठी वापरण्यात आलेले प्रत्येक घटक हे उच्च दर्जाचे असतात. त्यांचा भलामोठा दोन मजली आधुनिक मशीन्सने सुसज्ज असलेला मिठाईचा स्वच्छ कारखाना हीच या दांपत्याची मेहनत व कमाई आहे.
मनीषाताई लग्न झाल्यापासून प्रत्येक सण हा आपल्या दुकानातील दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कामगारांबरोबर आनंदाने साजरा करते. तिला फुलांच्या सजावटीची प्रचंड आवड असल्यामुळे प्रत्येक सणाला तिच्या दुकानात फुलांची सजावट असते. दिवाळीसाठी तिच्या दुकानासमोर ती आवर्जून मातीचा किल्ला बनवून त्यावर सजावट करून आपली संस्कृती जपते.
मनीषाताई आवर्जून सांगते मिठाईच्या दुकानात आम्ही फक्त मिठाई विकत नाही, तर ग्राहकांशी नाते जोडतो आणि हाच आमच्या नात्यातील, मिठाईच्या दुकानातील मिठाईचा गोडवा जगभर पसरतो.
(लेखक युट्यूब शेफ आहेत.)