महाराष्ट्रात रेल्वे स्थानकांवर लवकरच लॉटरी स्टॉल, महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचा रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा

महाराष्ट्रात रेल्वे स्थानकांवर लवकरच लॉटरी स्टॉल सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानकांवर लॉटरी स्टॉल उभारण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले असून पश्चिम आणि मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनित सिंग यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मुंबईसह राज्यभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर लॉटरी स्टॉल उभारण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच विविध मुद्द्यांवर रेल्वे अधिकारी पंकज खन्ना यांच्याशी सविस्तर चर्चाही करण्यात आली.

लॉटरी स्टॉलमुळे बेरोजगारांना रोजगार मिळून असून लाखो कुटुंबीयांना दिलासा मिळू शकेल, त्याचबरोबर सरकार आणि रेल्वेला महसूलही यातून मिळेल. आदी मुद्द्यांवर रेल्वे अधिकारी खन्ना यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. या मुद्द्यांबाबत पश्चिम रेल्वेचे व्यवस्थापक नीरज वर्मा मध्य रेल्वेचे व्यवस्थापक रजनीश गोयल यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असून रेल्वे मंत्रालयातील प्रशासकीय विभाग या मागणीवर गंभीरपणे पावले उचलणार आहेत.

नवी दिल्ली येथील रेल भवनात झालेल्या चर्चेत शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनेचे संस्थापक अध्यक्ष विलास सातार्डेकर यांच्यासह सरचिटणीस राजेश बोरकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, डॉ. मनीष गवई, कमल सैनी यांचा सहभाग होता.