मोदींच्या कार्यक्रमाला गर्दी करण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांवर सरकारचा दबाव

वाढवण बंदराला स्थानिक जनतेचा विरोध असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आसपासच्या महाविद्यालयांवर मिंधे सरकारने दबाव आणला होता. उरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून स्वेच्छेने या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे, असे हमीपत्र लिहून घेतले गेले होते. शिवाय सदर कार्यक्रम दुपारी एक वाजता असताना महाविद्यालयातून बसेस सकाळी साडेसहा वाजता सोडण्यात आल्या होत्या.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे यासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि शशिकांत झोरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना ई-मेल केला. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुळकर्णी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांना वेठीस धरून वाढवण बंदर पायाभरणी सोहळ्यास विद्यार्थ्यांना पाठविणाऱ्या महाविद्यालयावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. कुलगुरूंनी सदरहू महाविद्यालयास कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा मागविण्याचे आश्वासन दिले.