महाराष्ट्र वाहतूक सेनेचा अदानीला दणका, वाहतूकदारांच्या लुटीबाबत विचारला जाब

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर अदानी व्यवस्थापनाच्या माध्यमातून वाहतूकदारांची सर्रासपणे होणारी लूट, प्रवेशाच्या नावाखाली घेतली जाणारी बेकायदा प्रवेश फीबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणीत महाराष्ट्र वाहतूक सेनेने आज अदानीच्या कार्यालयावर धडक देत चांगलाच दणका दिला. यावेळी व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरीत वाहतूकदारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत जाब विचारण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर अदानी व्यवस्थापनाच्या माध्यमातून वाहतूकदारांची सर्रासपणे लूट करण्यात येत होती. वाहतुकदारांकडून प्रवेशाच्या नावे बेकायदा प्रवेश फी आकारून पैसे उकळले जात असल्याबाबत वाहतूकदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानुसार शिवसेना नेते आमदार अ‍ॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी, सरचिटणीस सूर्यकांत तांडेल, कार्याध्यक्ष अशोक टाव्हरे, उपाध्यक्ष-प्रमोद सावंत, नारायण पवार, साईकुमार माळोदे, चिटणीस धर्मेश राठोड या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत अदानी व्यवस्थापनासोबत वाहतूकदारांना होणाऱ्या अन्यायावर जाब विचारण्यात आला.

अदानी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी नसल्याबाबत प्रशासनला धारेवर धरून तातडीने अंमलबजावणी करण्यास भाग पाडण्यात आले. या आंदोलनप्रसंगी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.