आता बोरिवली, वसई, विरार येथील नागरिकांना थेट कोकणात जाता येणार आहे. बोरिवली रेल्वे स्थानकातून कोकणासाठी सुटणाऱया वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेसला गुरुवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यामुळे कोकणवासीयांनी बाप्पा पावल्याचे म्हणत आनंदोत्सव साजरा केला. परंतु हेच मराठी मन प्रचंड दुखावले असून वांद्रे टर्मिनस- मडगाव एक्स्प्रेसचे आमंत्रण गुजराती भाषेतून छापण्यात आल्याने महाराष्ट्रवासीयांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या ट्रेनमधून गुजराती प्रवास करणार आहेत का? त्यामुळे त्यांना समजावे म्हणून कार्यक्रमाचे आमंत्रण गुजराती भाषेतून छापण्यात आले? असे सवाल करतानाच मिंधे सरकारने एनडीए सरकारपुढे लाळघोटेपणा केल्याचा आरोप होत आहे.
महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवण्यात आले. मुंबईतील हिरे व्यापारही गुजरातला हलवण्यात आला. डायमंड बोर्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आणि सत्ताधारी आपल्या खुर्च्या टिकवण्यासाठी निव्वळ बघ्याची भूमिका घेत राहिले अशी जळजळीत टीका विरोधकांनी केली होती; परंतु त्याचे मिंधे सरकारला कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचेच पुन्हा उघड झाले आहे. वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेसला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. हा कार्यक्रम महाराष्ट्रात झाला असताना आणि वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस मुंबईतून कोकणसाठी सुरू करण्यात आली असताना या कार्यक्रमाचे आमंत्रण गुजरातीतून का छापण्यात आले, असा सवाल आता महाराष्ट्रवासीयांनी मिंधे सरकारला केला आहे.
येथे थांबा असेल
या एक्प्रेसला बोरिवली, वसई, भिवंडी, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम आणि करमाळी या रेल्वे स्थानकांवर थांबा असेल.