शरीराने व्यंग असले म्हणून काय झाले? निव्वळ दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावरही जग जिंकता येते, हे पॅरालिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडू अवघ्या जगाला दाखवून देत आहेत. यंदाच्या स्पर्धेत चार हजारांपेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवून एक नवा विक्रमच रचला आहे, पण इथे सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूची चित्तरकथा आहे, जी ऐकून प्रत्येकाचे डोळे डबडबतील, अंगावर शहारे उभे राहतील. खेळण्याची, जगण्याची आणि जग जिंकण्याची प्रेरणाही मिळेल.
एकीकडे हिंदुस्थानला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये धडधाकट दिग्गज खेळाडूंनी निराश केलं असलं तरी दिव्यांग खेळाडू पॅरिसमध्ये सोनं आणि हिंदुस्थानात मनं जिंकणार, हे आधीच स्पष्ट होते. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी त्याचा टीझरही पाहायला मिळाला आणि दुसऱ्या दिवशी ते प्रत्यक्षात साकारायलाही सुरूवात झाली.
हिंदुस्थानची छाती अभिमानाने फुगवणाऱ्या अवनी लेखराचीही कहाणी ऐकून भल्याभल्यांचे डोळे पाणावतील. वयाच्या बाराव्या वर्षी एका अपघातात तिला लकवा मारला गेला होता. खूप परिस्थिती बिकट होती. तिला चालताही येत नव्हते. व्हिलचेअरच तिचे पाय झाले होते. अशा स्थितीत सामान्य जीवन जगणेच एक संघर्ष असताना कुणी खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहू शकत नाही, पण तिने हार मानली नाही. तीन वर्षांच्या संघर्षानंतर तिने हातात गन घेतली. त्या क्षणापासून तिचे आयुष्य बदलले आणि मग तिने नेमबाजीलाच आयुष्य बनवले. अवघ्या पाच वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर ही दिव्यांग ‘गोल्डन गर्ल’ बनलीय. त्यामुळे तिची ही मेहनत हिंदुस्थानातील लाखो दिव्यांगांनाच नव्हे तर सामान्यांनाही प्रेरणादायी आहे.
नेमबाज मनीष नरवालचीही कहाणी अशीच जबरदस्त आहे. त्याने आजच 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य जिंकले. हे दिवसातील चौथे पदक होते. त्याचा उजवा हात जन्मापासूनच निकामी होता. दवा आणि दुआ केल्यानंतरही त्याच्या हातात काहीही फरक पडला नाही. त्याला कळायला लागले तेव्हा फुटबॉल त्याची आवड बनली. पण ते खेळताना तो जखमी झाला. हातातून रक्त येऊ लागले, पण त्याला जराही कळले नाही.
हे पाहून आईवडिलांनी त्याच्यापासून फुटबॉलला दूर केले. तेव्हा त्याच्या हातात नेमबाजीची पिस्टल आली. या खेळात त्याची गन धडधडायला सुरू झाली तेव्हा त्याला नेमबाज बनवण्यासाठी त्याचे बाबा तयारीला लागले. पण पिस्टल खरेदी करण्यासाठी सात लाख रुपये लागतात कळताच त्यांचे डोळे भिरभिरले, पण ते मागे हटले नाहीत. त्यांनी मुलाच्या खेळासाठी आपले घर विकले आणि त्याला पिस्टल भेट दिली. त्याच पुत्राने आपल्या वडिलांच्या त्यागाची परतफेड पदक जिंपून केलीय. अशी परतफेड प्रत्येक पालकाला आपल्या पाल्यांकडून अपेक्षित असते.
तिरंदाज शीतल देवीबद्दल काय सांगायचे ? ती तर साक्षात देवी आहे. तिला तर एकही हात नाही, पण तरीही ते धनुष्याचा प्रत्यंचा पायांनी खेचून अचूक बाण चालवतेय. हात नसूनही ती झाडांवर चढायची. हे पाहून सारेच अवाक् व्हायचे. जेव्हा तिने तिरंदाजीत करिअर घडवायचे ठरवले तेव्हा तिला धनुष्याला उचलणे जड जायचे, पण तिच्या प्रशिक्षकांनी तिला ठणकावून सांगितले की जर तू हात नसताना झाडावर चढू शकतेस, तर तुला धनुष्य उचलून चालवणे कठीण नाही.
आपल्या प्रशिक्षकाचे शब्द तिने खाली पडू दिले नाहीत. त्यांनी दिलेल्या स्फूर्तीतूनच शीतलने कठोर मेहनत करत धनुष्यावर आपले जीवन अर्पण केले. आता त्या अर्पणाला सोन्याचा रंग लाभला तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही. इतकी तिची तयारी झालीय. हिंदुस्थानी पथकातीलच नव्हे तर जगभरातून आलेल्या प्रत्येक खेळाडूची कहाणी अद्भुत आहे, आयुष्य बदलून टाकणारी आहे, हे मात्र नक्की.