विस्ताराचे तिकीट विसरा, बुकिंग 3 सप्टेंबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत बंद

विस्तारा विमानाने प्रवास करणाऱया प्रवाशांना 12 नोव्हेंबर 2024 नंतरच्या प्रवासासाठी तिकीट बुकिंग करता येणार नाही. विस्तारा कंपनीचे एअर इंडिया कंपनीत विलीनीकरण करण्यात येणार आहे. हे जवळपास निश्चित झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सिंगापूर एअरलाइन्सने याबाबत शुक्रवारी माहिती दिली. विलीनीकरण प्रक्रिया सुरू झाली असून कंपनीने थेट परदेशी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) हिंदुस्थान सरकारकडून मंजुरी मिळवली आहे.

विलीनीकरणाच्या प्रक्रियेनंतर विस्ताराची सर्व विमाने एअर इंडिया ब्रँड अंतर्गत चालविली जातील. विस्ताराने केवळ 11 नोव्हेंबर 2024पर्यंत सामान्य उड्डाणे कायम ठेवली आहेत. विस्तारा ही कंपनी एअर इंडियामध्ये विलीन झाल्यानंतर दोन्ही कंपन्यांची मिळून हवाई प्रवास सेवेतील ताकद वाढणार आहे. 2024च्या अखेरीस विलीनीकरण पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या काळात ग्राहकांना चांगल्या प्रकारे माहिती देण्यासाठी एअरलाइन्स कटिबद्ध आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती विस्ताराच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल. या कालावधीत मार्गदर्शन आणि सहाय्य प्रदान करेल, असे दोन्ही कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. या कंपन्यांतील विलीनीकरणाचा करार नोव्हेंबर 2022 मध्ये झाला होता.

– 3 सप्टेंबरपासून वेबसाइटवरून 12 नोव्हेंबरनंतरच्या प्रवासासाठी तिकीट बुकिंग बंद होईल, असे एअरलाइनने म्हटले आहे. विस्तारा 11 नोव्हेंबरपर्यंत बुकिंग घेणे आणि प्रवासासाठी फ्लाइट चालवणे सुरू ठेवेल.