कमला हॅरिस यांनी डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार झाल्यानंतर शुक्रवारी (हिंदुस्थानी वेळेनुसार) पहिली टीव्ही मुलाखत दिली. मुलाखतीत कमला हॅरिस म्हणाल्या, अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांना विसरायला आणि एक नवा मार्ग निश्चित करण्यासाठी तयार आहे. ट्रम्प देशाचे विभाजन करत असल्याचा आरोप हॅरिस यांनी केला. ट्रम्प असे वातावरण तयार करत आहेत, ज्याच्यामुळे एक अमेरिकन म्हणून आपले चरित्रहनन होत आहे. आपण अतिउदारमतवादी नसून मध्यममार्गी आहोत, असेही हॅरिस यांनी स्पष्ट केले.
कमला हॅरिस यांनी 2019 मध्ये सांगितले की, बेकायदेशीर स्थलांतर हा गुन्हा मानला जाऊ नये. या विषयावर मुलाखतीत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, अजूनही आपली भूमिका बदललेली नाही. मात्र सीमा ओलांडणाऱया गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी वादग्रस्त तेल गॅस प्रॅकिंगवर बंदी न आणता ते पर्यावरणासाठी अधिक चांगले करता येईल, असे वक्तव्य केले. आपले उदारतावादी मूल्य सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले.
– कमला हॅरिस म्हणाल्या की, जिंकले तर पहिल्या दिवसापासूनच मध्यमवर्गीयांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे काम करेल. हीच माझी सर्वात मोठी प्राथमिकता असेल.अमेरिकेतील दैनंदिन वस्तू स्वस्त करण्यासाठी मी प्रयत्नशील राहिल.